Skip to content

सीजेपीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे केंद्र सरकार घाबरले? सौरव दास यांना लंडनला जाण्यापासून रोखल्याचा अभिजित दीपके यांचा आरोप

पासपोर्ट सात वर्षांपूर्वी याच सरकारने जारी केला; आता अचानक त्रुटी कशा आढळल्या? असा सवाल | ऑक्सफर्ड युनियनच्या कार्यक्रमासाठी होते निमंत्रण

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) वाढत्या लोकप्रियतेमुळे केंद्र सरकार अस्वस्थ झाले असून, याच कारणातून पक्षाचे सह-संयोजक सौरव दास यांना ब्रिटनला जाण्यापासून जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे. ऑक्सफर्ड युनियन येथे आयोजित कार्यक्रमात कॉकरोच चळवळीवर बोलण्यासाठी सौरव दास यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्यांना रोखण्यात आले. या घटनेवरून दीपके यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दीपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सौरव दास यांचा पासपोर्ट २०१९ मध्ये याच केंद्र सरकारने जारी केला होता. सीजेपीची स्थापना होण्यापूर्वी याच पासपोर्टवर ते दोन वेळा परदेशात जाऊन आले आहेत. त्यावेळी पासपोर्टमध्ये कोणतीही त्रुटी किंवा विसंगती आढळली नव्हती. मात्र, सौरव दास हे प्रमुख कार्यकर्ते आणि लोकशाहीवादी चेहरा म्हणून पुढे आल्यानंतरच सरकारला पासपोर्टमधील त्रुटी आढळू लागल्या, असा आरोप त्यांनी केला.

दास यांना सोमवारी रात्री दिल्ली विमानतळावर जाण्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्याचा दावाही दीपके यांनी केला. प्रवासाच्या अगदी शेवटच्या क्षणी नोटीस देण्यामागचे कारण काय? त्यांना उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ का देण्यात आला नाही? सरकारला त्यांची इतकी भीती का वाटते? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

दरम्यान, सौरव दास यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर रोखण्यात आल्याचे सांगितले. पहाटे एक वाजताच्या लंडनला जाणाऱ्या विमानाने ते प्रवास करणार होते. मात्र, इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्यांचा पासपोर्ट फ्लॅग करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. ऑक्सफर्ड, केंब्रिज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एडिनबर्ग यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये कॉकरोच चळवळीवर बोलण्यासाठी निमंत्रण मिळाले असताना सरकारने आपल्याला प्रवास करू दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे आपले काम थांबणार नसून भविष्यात लंडन, पॅरिससह अन्य देशांत जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सीजेपी निवडणूक लढवणार नाही

दरम्यान, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉकरोच जनता पक्ष कोणत्याही जागेवर निवडणूक लढवणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही, असे अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुका जात आणि धर्माच्या मुद्द्यांऐवजी तरुणांच्या प्रश्नांवर केंद्रित असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जग कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नवीकरणीय ऊर्जेच्या भविष्यावर चर्चा करत असताना भारतातील राजकारण अद्याप जात आणि धर्माभोवतीच फिरत आहे. देशातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न असायला हवा, असे मत दीपके यांनी मांडले. सरकार कोणी स्थापन करावे, यावर भाष्य करण्याऐवजी तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका सीजेपीने घेतली आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror