साखरपुड्याला जाताना काळाचा घाला; वाळूच्या हायवाची दुचाकीला धडक, दोन चुलत भावांचा मृत्यू
एकाच कुटुंबातील दोन एकुलत्या एक मुलांचा मृत्यू; तिसरा भाऊ गंभीर जखमी
2 min read

छत्रपती संभाजीनगर : साखरपुड्याच्या आनंद सोहळ्यासाठी निघालेल्या तीन चुलत भावांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना करमाड परिसरात घडली. वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी (दि. २२) दुपारी एकच्या सुमारास करमाड-पिंप्रीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे नागुणीची वाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
अभिषेक पूनमचंद बिमरोट (वय २६) आणि अर्जुन काळुसिंग बिमरोट (वय २०, दोघे रा. नागुणीची वाडी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश कांतीलाल बिमरोट (वय ३०) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक, अर्जुन आणि प्रकाश हे तिघे चुलत भाऊ एकाच दुचाकीवरून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जोडवाडीकडे निघाले होते. करमाड-पिंप्रीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ आले असता सुखना नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात अभिषेक आणि अर्जुन यांचा मृत्यू झाला, तर प्रकाश गंभीर जखमी झाला.
या अपघातातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मृत अभिषेक आणि अर्जुन हे दोघेही त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. अभिषेकच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर अर्जुनच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. एकाच अपघातात कुटुंबातील दोन तरुण आधार हरपल्याने बिमरोट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साखरपुड्याच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणांचा प्रवास मृत्यूने संपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Mirror




