Skip to content

सहा वर्षांचा दुरावा संपला! भाजप-अकाली दलाची पुन्हा हातमिळवणी; अमित शाह म्हणाले, 'जुन्या मित्राचे स्वागत!'

२०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढणार; अमली पदार्थमुक्त पंजाबचा भाजप-अकाली दलाचा निर्धार

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

भाजप-अकाली दलाची पुन्हा हातमिळवणी
अमित शाह म्हणाले, 'जुन्या मित्राचे स्वागत!'

चंदीगड : पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली आहे. तब्बल सहा वर्षांपासून वेगवेगळे राजकीय मार्ग स्वीकारलेले भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष युती करून लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्या उपस्थितीत या नव्या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब झाले. गुरुनानक देव यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली.

युतीबाबत बोलताना अमित शाह यांनी अकाली दलासोबतच्या जुन्या राजकीय संबंधांना उजाळा दिला. दोन्ही पक्षांनी यापूर्वी अनेक निवडणुका एकत्र लढवल्या असून या प्रवासात विजय आणि पराभव दोन्ही अनुभवले आहेत. आता पुन्हा एकदा मैत्रीचे नाते दृढ होत असल्याचे सांगत त्यांनी अकाली दलाचे एनडीएमध्ये स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुखबीरसिंग बादल यांच्याशी संवाद साधला होता. अकाली दलाच्या पुनरागमनामुळे एनडीए पुन्हा पूर्ण झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचे शाह यांनी सांगितले. ही युती हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमली पदार्थमुक्त पंजाबचा संकल्प

युतीच्या माध्यमातून पंजाबमधील अमली पदार्थांचे वाढते व्यसन, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. राज्याला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देताना त्यांनी ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत पंजाब अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. यापूर्वी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनेही यासंदर्भात आश्वासने दिली होती, असा आरोप त्यांनी केला. सहा वर्षांनंतर झालेल्या या राजकीय पुनर्मिलनामुळे पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता असून विरोधी पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper