Skip to content

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी बैठक सोडून गाठले रुग्णालय

रुटीन चेकअपसाठी आलेल्या पवारांना डॉक्टरांनी तपासणीनंतर केले दाखल १५ दिवसांपूर्वीही प्रकृती बिघडल्याने घ्यावे लागले होते रुग्णालयात उपचार

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सुरू असलेली महत्त्वाची बैठक सोडून तातडीने रुग्णालय गाठले.

शरद पवार यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांची भेट घेऊन पवार यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधून प्रकृतीबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची गुरुवारी महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्यासह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय विषयांवर चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी बैठक सोडून तातडीने रुग्णालयात धाव घेतली.

१५ दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल

यापूर्वी दिवाळीच्या काळातही शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर त्याच दिवशी पुन्हा प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेही दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पवार पुन्हा राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रकृतीची चर्चा सुरू झाली आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror