Skip to content

शरद पवार निवृत्त होणार नाहीत; राज्यसभेचा कार्यकाळ बाकी

सुप्रिया सुळे यांनी फेटाळल्या निवृत्तीच्या चर्चा एनडीएसोबतच्या चर्चांवरही संताप

Smita Kulkarni
Smita Kulkarni

1 min read

खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार
खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी व्हावे, अशा चर्चांना पक्षात सुरुवात झाली आहे. या वृत्तावर पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत शरद पवार निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले.

सुळे म्हणाल्या, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील, तर ते संतापजनक आहे. शरद पवार निवृत्त होणार नाहीत. त्यांच्या राज्यसभेचा अजून पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. तेव्हा ते निवृत्त कसे होतील? कोणी निवृत्त व्हायचे, हे जनता ठरवेल.

पक्षाच्या एनडीए प्रवेशासाठी नव्या राजकीय समीकरणाची चाचपणी सुरू असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला होता. त्यावरही त्यांनी संताप व्यक्त केला.

संजय राऊत यांचाही संताप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य धर्मांध शक्तींविरोधात लढण्यात आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यात गेले आहे. सत्तेत जाण्याची घाई झालेल्या काही लोकांकडून हे विचार गुंडाळण्याचा प्रयत्न होत असेल, तर ते चुकीचे आहे. शरद पवार असे कधीही करणार नाहीत, असे सांगत राऊत यांनी संबंधितांना सुनावले. “ज्यांनी तुम्हाला मदत केली, त्यांनाच आराम करण्याचा सल्ला देताय? लाज वाटली पाहिजे!” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror