Skip to content

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एनडीएत घेण्यास भाजप अनुकूल

विलीनीकरणाशिवाय चौथा घटक करण्याचा पर्याय?

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राष्ट्रावादीच्या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले नाही, तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र चौथा घटक म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आणि महाराष्ट्रातील महायुतीत सहभागी करून घेण्यास भाजप अनुकूल असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. त्यामुळे विलीनीकरणाची प्रतीक्षा न करता शरद पवार यांच्या पक्षाला थेट आघाडीत सामावून घेण्याचा पर्याय भाजपकडून खुला ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने राज्यातील भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्याच काळात शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे आणि त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेण्यासाठी दोन पर्यायांचा विचार सुरू आहे. पहिल्या पर्यायानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन महायुतीत सहभागी होऊ शकतात. दुसऱ्या पर्यायानुसार, विलीनीकरणातील तांत्रिक आणि नेतृत्वविषयक अडचणी दूर होण्यास वेळ लागल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र चौथा घटक म्हणून एनडीए आणि महायुतीत सहभागी करून घेता येऊ शकते. दरम्यान, शरद पवार गटाने एनडीए किंवा महायुतीत सहभागी होण्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

कोणताही प्रस्ताव नाही; सुळे यांचे स्पष्टीकरण

खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षासमोर कोणताही प्रस्तावच नसेल, तर महायुतीत सहभागी होण्याबाबत भाष्य कसे करणार?. त्यामुळे भाजपकडून पर्याय खुला ठेवण्यात आल्याची चर्चा आणि शरद पवार गटाची अधिकृत भूमिका यामध्ये सध्या अंतर दिसून येत आहे.

दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी एक अट मांडली होती. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ केली गेल्यास विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करता येईल, असे संकेत त्यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुळे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले होते. मात्र, एखाद्या विधेयकाला पाठिंबा देणे आणि एनडीएमध्ये सहभागी होणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनडीएतील संभाव्य प्रवेश, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मिळणारा पाठिंबा हे तीन स्वतंत्र मुद्दे आहेत. भाजपने आघाडीत सहभागी होण्याचा पर्याय खुला ठेवल्याची चर्चा असली, तरी शरद पवार गटाचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror