शरद पवारांच्या कृतीतून निवृत्तीच्या चर्चांना उत्तर; गोविंद बागेत ऊसशेतीची पाहणी, AI तंत्रज्ञानाचा प्रयोग चर्चेत
एकरी ६० टनांवरून उत्पादन थेट १२० टनांवर; युगेंद्र पवारांसोबत आधुनिक शेतीची घेतली माहिती, फडणवीसांनीही निवृत्तीच्या चर्चांना म्हटले निरर्थक
1 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर – ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या १२ डिसेंबरला वाढदिवसाच्या दिवशी ते निवृत्ती जाहीर करणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग येथे थेट शेतात जाऊन उसाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार उपस्थित होते. त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
गोविंद बागेतील ऊसशेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या प्रयोगामुळे गेल्या १५ वर्षांपासून एकरी सरासरी ६० टन मिळणारे उत्पादन यंदा तब्बल १२० टनांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कमी पावसाच्या परिस्थितीतही हे उत्पादन साध्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पाण्याचे नियोजन आणि पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्याचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. नागपूर येथे बोलताना ते म्हणाले, "शरद पवार साहेब आजही सक्रिय आहेत. ते सातत्याने वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आणि कामांमध्ये रस घेतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य नाही. ते आयुष्यात कधीही थांबणार नाहीत. यापुढेही सकारात्मक काम करत राहतील."
त्यामुळे शरद पवारांच्या शेतीविषयक उपक्रमांमधील सहभागाने त्यांच्या सक्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. मात्र, त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Maharashtra Mirror




