शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड
पुण्यात साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय; २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान संमेलन होण्याची शक्यता, ‘अक्करमाशी’कारांच्या निवडीने साहित्यविश्वात आनंद
2 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात मंगळवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने लिंबाळे यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा सन्मान जोडला गेला आहे.
शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून, मराठी साहित्यविश्वात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत ४० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांची ‘अक्करमाशी’ ही आत्मकथा विशेष गाजली. या आत्मकथेतून त्यांनी जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, उपेक्षितांचे जगणे आणि वंचित समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. दलित साहित्य चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.
कादंबरी, आत्मकथा, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत लिंबाळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक वास्तवाचे भान, वंचितांच्या प्रश्नांची मांडणी आणि परिवर्तनवादी विचार हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या साहित्याची विविध भाषांमध्ये दखल घेतली गेली असून, साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाच्या परिसरात प्रथमच हे संमेलन होणार असल्याची माहिती आहे. संमेलनाच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची झालेली निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

Maharashtra Mirror




