Skip to content

वारजे परिसरात गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई

सराईत महिलेकडून सुमारे ६०० ग्रॅम गांजा जप्त

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

 गुन्हे शाखा युनिट-३
गुन्हे शाखा युनिट-३

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वारजे परिसरात गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने धडक कारवाई करत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका सराईत महिलेला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तिच्याकडून सुमारे २९ हजार ६०० रुपये किमतीचा ५९२ ग्रॅम गांजा आणि विक्रीची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुनीता सिकन्दर भाट (वय ५५) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-३ चे पथक सिंहगड रोड, नऱ्हे, नांदेड सिटी, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे तपासणी व गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. पथक वारजे येथील अभिनव भारत सोसायटीजवळ आले असता, पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पोलीस अंमलदार तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे सुनीता भाट गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून कायदेशीर कारवाईचे आदेश घेतले. त्यानंतर पथकाने अमर भारत सोसायटी परिसरात जाऊन महिलेला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान तिच्याकडून सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेवर यापूर्वीही अंमली पदार्थ विक्रीचे दोन गुन्हे दाखल असून ती अभिलेखावरील सराईत आरोपी आहे.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिला गुन्हा दाखल करून वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त तेजस्वीनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्यासह युनिट-३ च्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror