लोणीकाळभोरमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता अवैध कारखाना; गुन्हे शाखेचा एफडीए अधिकाऱ्यांसह छापा, एकजण ताब्यात
2 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : लोणीकाळभोर परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तयार माल, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, पॅकिंग मशीन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
२१ नोव्हेंबर रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पूर्व प्रादेशिक विभागात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार परेश सावंत आणि सचिन कांबळे यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्याचा अवैध कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
इंदोरा इंग्लिश स्कूलसमोर, गायकवाडवस्ती येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी रोहित गुप्ता हा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करताना रंगेहात आढळून आला.
पोलिसांनी कारखान्यातून तयार सुगंधित तंबाखू, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, पॅकिंग मशीन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्री करण्यास बंदी आहे. असे असतानाही अवैधरीत्या या पदार्थांची निर्मिती आणि साठवणूक केल्याप्रकरणी रोहित गुप्ता याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २०४ आणि २४५ अंतर्गत २२ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानावडे, सहायक फौजदार जोतिबा कुरळे तसेच पोलीस अंमलदार परेश सावंत, महेश बारयकर, प्रफुल्ल मोरे आणि सचिन कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




