Skip to content

रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांचा राज्यव्यापी बंद; कोल्हापूर व पुण्यात परिणाम, मुंबई-ठाण्यात सेवा सुरू

पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर गदा आल्याचा आरोप; परवानग्या, वाहनांची नोंदणी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांचा राज्यव्यापी बंद; कोल्हापूर व पुण्यात परिणाम, मुंबई-ठाण्यात सेवा सुरू
पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर गदा आल्याचा आरोप; परवानग्या, वाहनांची नोंदणी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई / पुणे / कोल्हापूर :- रॅपिडोच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुचाकी प्रवासी वाहतुकीच्या निषेधार्थ राज्यभरातील रिक्षा संघटनांनी आज (सोमवार, 23 नोव्हेंबर) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदला मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरसह विविध जिल्ह्यांतील संघटनांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी शहरांमधील प्रत्यक्ष रिक्षा वाहतुकीवर संमिश्र परिणाम दिसून येत आहे.

बंदमागची कारणे आणि प्रमुख मुद्दे

राज्यात सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर आणि उत्पन्नावर थेट परिणाम होत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. “आम्हाला भाडे मिळत नाही आणि खासगी कंपन्यांना सर्व पैसे मिळतात,” अशी भावना चालकांकडून व्यक्त होत आहे.

दुचाकीवरील प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेले परवाने, वाहनांची नोंदणी, चालकांकडे असणारा बॅच आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शहरनिहाय परिस्थिती :

विविध शहरांमध्ये या बंदचा परिणाम वेगवेगळा दिसून येत आहे

कोल्हापूर : हजारो रिक्षा चालक संपात सहभागी झाल्याने शहरातील वाहतुकीवर परिणाम जाणवत असून, बस स्थानक आणि रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांना पायी चालत जावे लागत आहे. रिक्षा चालक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदर्भ देत, रिक्षा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे धोरण असल्याचा आरोप चालकांनी केला आहे.

पुणे : रिक्षा संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला, तरी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी रिक्षा वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सकाळी 10 वाजल्यानंतर चालक आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुण्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पिंपरीत विधान परिषदेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने रिक्षा सुरू असल्याचे चित्र असून, उपनगरांमध्ये या बंदचा फारसा परिणाम दिसून येत नाही. प्रवाशांची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे.

ठाणे : मनसेसह सर्वपक्षीय रिक्षा वाहतूक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असला, तरी ठाणे शहरात रिक्षा सेवा सुरळीत सुरू असून बंदबाबत अद्याप ठोस सूचना न आल्याचे चालकांनी सांगितले आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर विविध शहरांतील चाकरमानी आणि प्रवाशांची काहीशी धावपळ व गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper