Skip to content

राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक; रोहित पवार उपस्थित राहणार? शेतकरी मोर्चावरून पक्षात मतभेदाची चर्चा

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक; शेगाव ते नागपूर मोर्चाला पाठिंबा देण्याबाबत होणार चर्चा

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि.२६) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे होणाऱ्या या बैठकीला राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, आमदार रोहित पवार या बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

शेतकरी मोर्चावरून पक्षात नाराजी?

आमदार रोहित पवार यांनी विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ४ ते ९ डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या आंदोलनाची घोषणा करताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. उद्याच्या बैठकीत या मोर्चाला पक्षाने पाठिंबा द्यायचा की नाही, यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्षांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

रोहित पवारांच्या गुप्त बैठकीचीही चर्चा

दरम्यान, रोहित पवार यांनी नागपूर दौऱ्यात विदर्भातील काही पदाधिकाऱ्यांसोबत गोपनीय बैठक घेतल्याचे वृत्त समोर आले होते. या बैठकीत आगामी मोर्चाचे नियोजन आणि पक्षातील वरिष्ठांची नाराजी दूर करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा सूत्रांनी केला.

विलीनीकरण आणि एनडीएबाबतही उत्सुकता

दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा आणि शरद पवार यांच्या एनडीएतील सहभागाबाबतच्या राजकीय अटकळींमुळेही या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पक्षाची नेमकी भूमिका काय ठरते, रोहित पवार उपस्थित राहतात का आणि शेतकरी मोर्चाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror