मार्केट यार्डात जड गोण्यांवरून हमाल आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा
६० ते ७० किलोच्या गोण्यांमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात; १ डिसेंबरपर्यंत वजन कमी करण्याची मुदत, संतोष नांगरे-पाटील यांचा इशारा
2 min read

पुणे : हमाल कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा पुणे मार्केट यार्डात ऐरणीवर आला आहे. भाजीपाला विभागात ५० किलोच्या मर्यादेचे उल्लंघन करून ६० ते ७० किलो वजनाच्या वाटाणा आणि गाजराच्या गोण्या दाखल झाल्याने कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित गाड्यांमधील माल उतरविण्यास नकार देत कामगारांनी काम बंद केले. यानंतर आडते, व्यापारी आणि कामगार प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. या बैठकीत गोण्यांचे वजन कमी करण्यासाठी १ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. मात्र, या मुदतीत निर्णय न झाल्यास ५ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे-पाटील यांनी दिला आहे.
कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने शेतमालाच्या गोण्यांचे वजन ५० किलोपेक्षा कमी असावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. जड गोण्या उचलताना कामगारांच्या पाठीचा कणा, मणके, गुडघे आणि स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो. दीर्घकाळ अशा पद्धतीने काम केल्याने विविध शारीरिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोण्यांचे वजन मर्यादित ठेवण्याची मागणी कामगार संघटनांनी लावून धरली आहे.
यापूर्वी कामगार युनियनच्या वतीने शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनेही राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये यासाठी आंदोलने करण्यात आली होती. मात्र, वारंवार मागणी करूनही जादा वजनाच्या गोण्यांची आवक सुरूच असल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत गोण्यांचे वजन कमी न केल्यास ५ डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष नांगरे-पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे व्यापारी, आडते आणि शेतकरी या मुदतीत वजनमर्यादेचे पालन करतात का, याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Mirror




