Skip to content

महिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदावर अमेरिका आणि ब्रिटनची बाजी!

२०३१ मध्ये चार देशांत स्पर्धा, तर २०३५ मध्ये यूकेमध्ये रंगणार फुटबॉलचा थरार

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

महिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदावर अमेरिका आणि ब्रिटनची बाजी
२०३१ मध्ये चार देशांत स्पर्धा, तर २०३५ मध्ये यूकेमध्ये रंगणार फुटबॉलचा थरार

झुरिच : आंतरराष्ट्रीय फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. फिफा अर्थात आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने २०३१ आणि २०३५ या दोन महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धांच्या यजमान देशांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार २०३१ च्या महिला विश्वचषकाचे आयोजन अमेरिका, मेक्सिको, कोस्टा रिका आणि जमैका हे चार देश संयुक्तपणे करणार आहेत. तर २०३५ च्या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सोमवारी (२३ नोव्हेंबर) फिफाच्या विशेष काँग्रेसमध्ये या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे २०३१ मध्ये प्रथमच महिला विश्वचषक स्पर्धेत ४८ संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे महिला फुटबॉलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने यापूर्वी १९९९ आणि २००३ मध्ये महिला विश्वचषकाचे आयोजन केले आहे. मात्र, २०३५ मध्ये पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, महिला फुटबॉलचा जागतिक स्तरावर विस्तार करणे आणि अधिकाधिक मुलींना या खेळाकडे आकर्षित करणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात महिला फुटबॉलला नवी उंची मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper