महिला पोलीस भरतीत मासिक पाळीमुळे संधी हुकणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय
आरोग्य तपासणीनंतर उमेदवारांना मिळणार पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ; हजारो तरुणींना दिलासा
1 min read

मुंबई : महिला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान एखाद्या महिला उमेदवाराला मासिक पाळी आल्यास तिला आता चाचणीसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. संबंधित उमेदवाराची आरोग्य तपासणी केल्यानंतर तिला पाच ते सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली.
महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न अनेक तरुणी पाहत असतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या वर्षभर कठोर मेहनत घेतात. पहाटेपासून मैदानावर सराव, धावण्याचा नियमित अभ्यास आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मात्र, ऐन शारीरिक चाचणीच्या दिवशी मासिक पाळी आल्यास अनेक उमेदवारांना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत चाचणी देणे कठीण होत असल्याने वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती निर्माण होते.
आतापर्यंत अशा परिस्थितीत अनेक महिला उमेदवारांसमोर भरतीची संधी गमावण्याचे संकट उभे राहत होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता मासिक पाळीमुळे कोणत्याही तरुणीची भरतीची संधी हुकणार नाही. आरोग्य तपासणीनंतर संबंधित उमेदवाराला चाचणी पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र वेळ दिला जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणींना दिलासा मिळाला आहे. महिला उमेदवारांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत त्यांना अधिक अनुकूल संधी उपलब्ध होणार आहे.

Maharashtra Mirror




