Skip to content

महालक्ष्मी रेसकोर्सवरील कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन; १२ जणांची चाचणी पॉझिटिव्ह

मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनची पहिलीच कारवाई; ५५ जणांची तपासणी, संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

महालक्ष्मी रेसकोर्स
महालक्ष्मी रेसकोर्स

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने (एएनसी) अत्याधुनिक तपासणी व्हॅनच्या माध्यमातून धडक कारवाई करत ५५ जणांची तपासणी केली. यापैकी १२ जणांची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. या सर्वांना पुढील वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स येथे सुरू असलेल्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान काही तरुणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर अँटी नार्कोटिक्स सेलच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी मोहीम राबवली. यावेळी ५५ जणांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात १२ जणांच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले. त्यानंतर संबंधितांना ताडदेव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, अंतिम अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी पहिली कारवाई

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या अत्याधुनिक अँटी नार्कोटिक्स व्हॅनचा ही पहिलीच प्रत्यक्ष कारवाई आहे. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी या व्हॅनच्या माध्यमातून अमली पदार्थ सेवनाच्या संशयावरून मोठी तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोठ्या संगीत कार्यक्रमांमध्ये तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी या व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे.

गोरेगावमधील दुर्घटनेनंतर पोलिसांची विशेष खबरदारी

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. ११ एप्रिल रोजी आयोजित या कॉन्सर्टला तीन ते चार हजार तरुण उपस्थित होते. यावेळी मद्य आणि अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे काही तरुणांची प्रकृती बिघडली होती. या घटनेत ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर एका तरुणीची प्रकृती गंभीर झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरातील मोठे कॉन्सर्ट, संगीत महोत्सव आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरील कारवाईमुळे अशा कार्यक्रमांमधील अमली पदार्थांच्या सेवनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror