महाराष्ट्रात रब्बी पेरण्यांचा ऐतिहासिक नीचांक; दुष्काळाचे संकट गंभीर
आतापर्यंत १४.७४ लाख हेक्टरवर पेरणी - १९७२ च्या तुलनेत पेरणी क्षेत्रात मोठी घट
2 min read

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. त्याचा मोठा फटका रब्बी हंगामातील पेरण्यांना बसला असून, पेरणीचे क्षेत्र ऐतिहासिक नीचांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा आतापर्यंत राज्यात केवळ १४ लाख ७४ हजार ३०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. १९७२-७३ च्या दुष्काळी वर्षात ४७.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदाची पेरणी अत्यंत कमी आहे.
डिसेंबरअखेरपर्यंत रब्बीच्या पेरण्या सुरू राहतात. मात्र, यंदा पेरणीचे एकूण क्षेत्र जास्तीत जास्त २० ते २५ लाख हेक्टरपर्यंतच पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्याच्या रब्बी हंगामाच्या इतिहासातील ही सर्वांत कमी पेरणी ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांत राज्यात ७६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहितीही समोर आली आहे.
प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मोसमी पावसावर परिणाम झाला आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत १९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात तर सरासरीपेक्षा ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे. काही अपवाद वगळता राज्यातील बहुतांश भागांत पावसाने ओढ दिली. जुलै महिन्यातील अवघ्या १५ दिवसांत झालेल्या पावसावर खरीप हंगामाची भिस्त राहिली. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धताही अनिश्चित बनली आहे. पाण्याची टंचाई आणि जमिनीतील ओलावा कमी असल्याने रब्बीच्या पेरण्यांचा वेग मंदावला आहे.
कृषी विभागाकडे १९६० पासून रब्बी हंगामातील पेरण्यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध आहे. राज्यातील रब्बी हंगामाचे सरासरी पेरणी क्षेत्र ५५ ते ६० लाख हेक्टर इतके आहे. १९७२-७३ मध्ये झालेल्या ४७.२९ लाख हेक्टर पेरणीमध्ये ३६.६४ लाख हेक्टरवर अन्नधान्य, ४.३१ लाख हेक्टरवर कडधान्य, तर ६.३४ लाख हेक्टरवर तेलबियांची पिके घेण्यात आली होती. यंदा आतापर्यंत झालेल्या पेरणीपैकी ७ लाख ७९ हजार ८१२ हेक्टरवर अन्नधान्य, ६ लाख ७८ हजार ३८५ हेक्टरवर कडधान्य, तर केवळ १६ हजार १०६ हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या सुरू राहिल्या, तरी एकूण क्षेत्र २० ते २५ लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामावर दुष्काळाचे गंभीर सावट निर्माण झाले आहे.

Maharashtra Mirror




