महाराष्ट्रातील ३ हजार ८३२ अंगणवाड्या होणार स्मार्ट
ई-लर्निंग, वॉटर प्युरिफायर आणि आधुनिक स्वयंपाकघराच्या सुविधा पहिल्या टप्प्यात सरकारी जागा व वीजजोडणी असलेल्या केंद्रांची निवड
1 min read

मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांतील लहान मुलांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ३ हजार ८३२ अंगणवाडी केंद्रांचे ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांमध्ये ई-लर्निंग साधने, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, आधुनिक स्वयंपाकघर आणि पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
या योजनेमुळे अंगणवाड्यांमधील शिक्षणपद्धतीत बदल होणार आहे. ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाणार असून, शून्य ते सहा वयोगटातील मुलांना खेळातून आणि डिजिटल माध्यमांतून प्राथमिक शिक्षण घेता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांनाही लहान वयापासून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची ओळख होणार आहे.
निवडलेल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये ई-लर्निंगसाठी टीव्ही किंवा संगणक संच, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन आणि स्वच्छ भारत किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय आधुनिक स्वयंपाकघर आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाही उभारली जाणार आहे.
मुलांसह गर्भवती आणि स्तनदा मातांनाही लाभ
या योजनेचा थेट लाभ शून्य ते सहा वयोगटातील मुलांना होणार आहे. तसेच अंगणवाडी सेवांशी जोडलेल्या गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही या केंद्रांमधील सुधारित सुविधांचा फायदा मिळणार आहे. शिक्षणासोबत पोषण, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

Maharashtra Mirror




