Skip to content

महापौर निवासस्थानीच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली; वृक्षांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई

खुद्द पुण्याच्या महापौर निवासस्थानातील झाडांवरच दिवाळीनिमित्त झगमगाट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

महापौर निवासस्थानीच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली
वृक्षांवर बेकायदेशीर विद्युत रोषणाई

पुणे : कोणत्याही वृक्षावर विद्युत रोषणाई करण्यास किंवा खिळे ठोकण्यास उच्च न्यायालयाची स्पष्ट मनाई असतानाही, खुद्द पुण्याच्या महापौर निवासस्थानातील झाडांवरच दिवाळीनिमित्त झगमगाट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांच्या बंगल्यातच कायद्याचे उल्लंघन होत असल्याने पर्यावरणप्रेमी रुपेश राम केसेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी महापौर निवासस्थानाच्या आवारातील मोठ्या वृक्षांवर विद्युत माळा सोडण्यात आल्या आहेत. सण संपल्यानंतर ही रोषणाई काढण्यात येईलही. मात्र ती लावताना आणि दिवे सुरू ठेवताना आपण उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहोत, याची जाणीव महापौरांना किंवा महापालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कशी झाली नाही, असा प्रश्न रुपेश राम केसेकर यांनी उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्यांना नियमांचे धडे देणाऱ्या प्रशासनाकडूनच अशा प्रकारे नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

वृक्ष प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष?

विशेष म्हणजे, महापौर निवासस्थानाच्या अगदी शेजारीच पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाच्या खिडकीतूनही महापौर बंगल्यातील झाडांवरील ही बेकायदेशीर विद्युत रोषणाई स्पष्टपणे दिसते. ज्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर शहरातील वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी आहे, त्यांना आपल्या शेजारीच सुरू असलेला हा प्रकार दिसला नाही का, असा सवाल विचारला जात आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

शहराचे पालकत्व असलेल्या महापौरांच्या निवासस्थानात पर्यावरण नियमांचे उल्लंघन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मे महिन्यातही महापौर बंगल्याच्या आवारात वृक्षांची कत्तल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्या घटनेचे पडसाद ताजे असतानाच, आता दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या वृक्षांवर बेकायदेशीरपणे विद्युत रोषणाई करून झाडांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराचा खुलासा नक्की कोण करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आयुक्तांकडून कठोर कारवाईची अपेक्षा

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त हेच पदसिद्ध 'वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष' आहेत. सध्या महापालिका आयुक्त शहरात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम अत्यंत धडाडीने राबवत असून बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई करत आहेत. त्याच धर्तीवर त्यांनी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी ओळखून या गंभीर बाबीची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यापुढे पुण्यात महापौर निवासस्थान असो, आयुक्त निवासस्थान असो, सामान्य नागरिकांचे घर असो किंवा कोणतीही व्यावसायिक आस्थापना असो; कोणाकडूनही शहरातील वृक्षांवर विद्युत रोषणाई होणार नाही, याची कठोर अंमलबजावणी आयुक्तांनी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper