Skip to content

मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध नाही; पण दक्षिणेवर अन्याय नको

राष्ट्रवादीच्या भूमिकेवर पृथ्वीराज चव्हाण यांचा मविआला घरचा आहेर

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

सातारा, महाराष्ट्र मिरर : मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीतच मतभेद उफाळण्याची चिन्हे दिसत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मित्रपक्षांना स्पष्ट शब्दांत सुनावले. “डिलिमिटेशनला आमचा विरोध नाही; मात्र या प्रक्रियेमुळे दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होता कामा नये. एकीकडे इंडिया आघाडीत राहायचे आणि दुसरीकडे मोदी सरकारला फायदेशीर ठरेल अशी भूमिका घ्यायची, हा दुटप्पीपणा थांबवा,” असा थेट इशारा चव्हाण यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त करत आघाडीतील पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवावी, असेही बजावले.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शिवचरित्रावरील पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भूमिकेवर बोलताना चव्हाण म्हणाले, एकीकडे इंडिया आघाडीत राहायचे आणि दुसरीकडे मोदी सरकारला सोयीची ठरेल अशी भूमिका घ्यायची, असा दुटप्पीपणा किंवा तळ्यात-मळ्यात करू नये. डिलिमिटेशन हा मोठा आणि गुंतागुंतीचा विषय असून त्यावर एका वाक्यात भाष्य करता येणार नाही. केंद्र सरकारकडून महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे तीन ते चार मुद्दे एकत्र करून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शरद पवार चुकीचा निर्णय घेणार नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेसकडून डिलिमिटेशनला समर्थन देण्याची भूमिका मांडली जात असल्याच्या प्रश्नावर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. अशा भूमिकेचा थेट फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होऊ शकतो, असे ते म्हणाले. आघाडीतील पक्षांनी स्पष्ट भूमिका घ्यावी. एकतर थेट सत्तेत जावे किंवा आघाडीचा धर्म पाळावा, असेही त्यांनी सुनावले. मात्र, शरद पवार याबाबत कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror