Skip to content

‘भाऊ, फ्लेक्स काढा!’चौकाचौकांतील फ्लेक्सबाजीला बसणार आता आळा

पोर्टलवरून होणार चेहरे आणि आकडेवारीची पोलखोल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 min read

‘भाऊ, फ्लेक्स काढा!’चौकाचौकांतील फ्लेक्सबाजीला बसणार आता आळा
पोर्टलवरून होणार चेहरे आणि आकडेवारीची पोलखोल

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर : शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवल्यानंतर आता पुणे महापालिका प्रशासनाने चौकाचौकांत लागणाऱ्या बेकायदा फ्लेक्स, बॅनर्स आणि होर्डिंग्जविरोधात कडक पावले उचलली आहेत. वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा, राजकीय प्रसिद्धी तसेच विविध कार्यक्रमांच्या नावाखाली परवानगीशिवाय झळकणारे फ्लेक्स आणि त्यावर दिसणारे चेहरे आता महापालिकेच्या थेट रडारवर आले आहेत. विशेष म्हणजे, शहरात कोणाचे किती बेकायदा फ्लेक्स लागले आहेत, याची संख्यात्मक आकडेवारीच थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

रस्ते, पदपथ, चौक, दुभाजक, विजेचे खांब, झाडे, पूल, भिंती आणि इतर सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांवर महापालिकेच्या पूर्वलेखी परवानगीशिवाय बॅनर्स, फ्लेक्स, पोस्टर्स, झेंडे, कमानी, कटआऊट्स किंवा जाहिराती लावण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागात सध्या अवघे १९ लिपिक आणि १५० बिगारी कार्यरत आहेत. मर्यादित मनुष्यबळामुळे शहरातील हजारो बेकायदा फ्लेक्सवर प्रत्येक वेळी तातडीने कारवाई करणे प्रशासनाला कठीण जात होते.

‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ नवे पोर्टल सुरु

यावर प्रभावी उपाय म्हणून महापालिकेने bhauflexkadha.pmc.gov.in या संकेतस्थळावरून ‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पोर्टलद्वारे नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे फोटो आणि संबंधित ठिकाणाची माहिती थेट अपलोड करता येणार आहे. एका ठिकाणचा एकच फोटो ग्राह्य धरला जाणार असून, फ्लेक्सवरील चेहऱ्यांच्या आधारे शहरात कोणाचे किती अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत, याची यादी सार्वजनिक केली जाणार आहे. या यंत्रणेची चाचणी सध्या सुरू असून ती लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी दिली आहे.

पूर्वसूचनेशिवाय कारवाई; खर्च संबंधितांकडून वसूल

आकाशचिन्ह व परवाना विभागाने जाहीर सूचना प्रसिद्ध करत स्पष्ट केले आहे की, शहरात कोणतेही अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स किंवा पोस्टर आढळल्यास कोणतीही स्वतंत्र पूर्वसूचना न देता ते तत्काळ काढून टाकण्यात येईल. फ्लेक्स काढण्याचा संपूर्ण खर्च संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडून वसूल केला जाईल. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम २४५ आणि संबंधित तरतुदींनुसार जाहिरात शुल्क व दंडात्मक कारवाईही करण्यात येईल.

चेहरा झळकला तरी गुन्हा; मुद्रक व आयोजकही अडकणार

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या या नियमावलीनुसार, फ्लेक्स उभारणारी व्यक्ती किंवा त्यास कारणीभूत ठरणारी व्यक्ती, ज्यांचे नाव, छायाचित्र किंवा पदनाम लाभार्थी म्हणून प्रदर्शित आहे अशी व्यक्ती, संबंधित मुद्रक व जाहिरात संस्था तसेच कार्यक्रमाचे आयोजक अशा सर्वांवरच फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ चे कलम ३ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील तरतुदींनुसार या प्रकरणी तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

फ्लेक्सवरील छायाचित्र किंवा नाव संबंधित व्यक्तीच्या माहितीने व संमतीनेच लावण्यात आले आहे, असे चौकशी व अभियोगासाठी गृहीत धरले जाईल. मात्र, एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा नाव विनासंमती लावले असल्यास, संबंधित व्यक्तीने ते निदर्शनास येताच क्षेत्रीय कार्यालयात लेखी अस्वीकृती (डिस्क्लेमर) देणे आणि संबंधित पोलीस ठाण्यात माझ्या संमतीशिवाय प्रदर्शन झाल्याची तक्रार दाखल करणे आवश्यक राहील.

मुद्रकाचे नाव बंधनकारक; जनजागृतीवर भर

प्रत्येक छापील होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टरवर मुद्रकाचे नाव, पत्ता तसेच ज्याच्या सांगण्यावरून छपाई करण्यात आली त्या व्यक्तीचे नाव व पत्ता नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अनधिकृत प्रदर्शनासाठी छपाई करणाऱ्या मुद्रकांवर सहआरोपी (ॲबेटॉर) म्हणून कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. निर्धारित जागांवर परवानगी घेऊन जाहिराती लावण्यासाठी विहित शुल्क भरून महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा क्षेत्रीय कार्यालयात अर्ज करता येईल.

नागरिकांनीही bhauflexkadha.pmc.gov.in किंवा ‘पीएमसी केअर’ क्रमांकावर अनधिकृत फ्लेक्सची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ दंडात्मक कारवाईपेक्षा कोणाचे किती फ्लेक्स लागले आहेत हे समाजासमोर आणून संबंधितांना स्वतःहून फ्लेक्स काढण्याची जाणीव करून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी स्पष्ट केले आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper