बोपदेव घाटात भरधाव टेम्पोने चिरडल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर
भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले
1 min read

पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात बुधवारी एका भरधाव आयशर टेम्पोने बसची वाट पाहत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोपदेव घाटाच्या एका वळणावर वेगात असलेल्या आयशर टेम्पोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेला हा टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टॉपवर घुसला. त्यावेळी तेथे शाळा आणि महाविद्यालयाचे काही विद्यार्थी बसची वाट पाहत उभे होते. टेम्पोचा वेग इतका प्रचंड होता की विद्यार्थ्यांना बाजूला होण्याची संधीच मिळाली नाही. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तिन्ही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घाटातील वाहनांच्या अनियंत्रित वेगाबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, हा अपघात ब्रेक निकामी झाल्याने झाला की चालकाच्या निष्काळजीपणामुळे, याचा तपास सुरू आहे.
https://epaper.maharashtramirror.com/

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




