Skip to content

'प्रसिद्धीलोलुप अन् वाचाळवीर निवृत्त अधिकाऱ्यांच्या बाष्कळ बडबडीला पुणेकर भीक घालणार नाहीत

अतिक्रमण कारवाईवरील टीकेवरून माजी सनदी अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्तांसह सर्व खातेप्रमुखांचा जोरदार पलटवार

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 min read

'प्रसिद्धीलोलुप अन् वाचाळवीर निवृत्त अधिकाऱ्यांच्या बाष्कळ बडबडीला पुणेकर भीक घालणार नाहीत
अतिक्रमण कारवाईवरील टीकेवरून माजी सनदी अधिकाऱ्यावर महापालिका आयुक्तांसह सर्व खातेप्रमुखांचा जोरदार पलटवार

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या अतिक्रमणविरोधी धडक मोहिमेवरून सध्या प्रशासकीय वर्तुळात चांगलेच रणकंदन माजले आहे. महापालिकेत यापूर्वी वरिष्ठ पदावर काम केलेल्या एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने समाजमाध्यमांवरून या कारवाईवर आणि विद्यमान प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या टीकेला महापालिकेच्या सर्व खातेप्रमुखांसह आयुत्क नवलकिशोर राम यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, संबंधित अधिकाऱ्याचा 'प्रसिद्धीलोलुप' आणि 'वाचाळवीर' असा उल्लेख करत त्यांच्या कार्यकाळाचाच लेखाजोखा मांडला आहे.

नेमका वाद काय?

पुणे शहरात रस्ते, पदपथ (फूटपाथ) तसेच इमारतींचे 'फ्रंट मार्जिन' (सामासिक अंतर) आणि पार्किंगच्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने कोणताही राजकीय दबाव न जुमानता पुढील दोन महिने अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, महापालिकेत यापूर्वी सर्वोच्च पदावर काम केलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले होते.

खातेप्रमुखांचा सणसणीत टोला

या टीकेची गंभीर दखल घेत महापालिकेच्या सर्व खातेप्रमुखांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित निवृत्त अधिकाऱ्याचे नाव न घेता त्यांनी म्हटले आहे की, "नागरिकांचे जीवन सुकर व्हावे आणि रस्त्यांची पूर्ण क्षमता वापरता यावी, या प्रामाणिक हेतूने प्रशासनाने पारदर्शकपणे ही मोहीम हाती घेतली आहे. मात्र, महापालिकेत वरिष्ठ पदावर काम केलेले व प्रसिद्धीसाठी हपापलेले काही अधिकारी प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या कृत्यावर टीका करत आहेत. स्वतःच्या सोशल मीडियाचा वापर करून प्रशासनाची बदनामी करण्याचा खटाटोप त्यांच्याकडून सुरू आहे."

कार्यकाळावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह

खातेप्रमुखांनी संबंधित अधिकाऱ्याच्या मागील कार्यकाळावरही बोट ठेवले आहे. "हे सद्गृहस्थ जेव्हा पुणे महापालिकेत सर्वात वरिष्ठ पदावर कार्यरत होते, तेव्हा त्यांनी शहराच्या सुधारणेसाठी नेमकी कोणती ठोस पावले उचलली आणि त्यातून काय फलनिष्पत्ती झाली, हे शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या आधीचे आणि नंतरचे सर्वच अधिकारी कसे बिनकामाचे आहेत आणि केवळ आपणच कसे सर्वज्ञानी आहोत, अशा सुरस आणि तद्दन खोट्या कथा ते सांगत सुटले आहेत. जर त्यांना खरोखरच पुण्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा असता, तर त्यांनी आपल्या काळात व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून पारदर्शकता आणली असती. त्यांनी वेळीच योग्य पावले उचलली असती, तर आज शहरावर ही परिस्थिती उद्भवलीच नसती," अशा शब्दांत खातेप्रमुखांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

निवृत्तीनंतर हातात कोणतेही काम नसल्याने आलेल्या नैराश्यातून हे सर्व नकारात्मक प्रयोग सुरू असल्याचा टोलाही या निवेदनातून लगावण्यात आला आहे. "कोणत्या अधिकाऱ्याने पुण्यासाठी निस्पृहपणे आणि तळमळीने काम केले आहे आणि कोण केवळ तोंडाची वाफ दवडत आहे, याची पुणेकरांना पुरेपूर जाण आहे. अशा प्रसिद्धीलोलुप आणि वाचाळवीर निवृत्त अधिकाऱ्याच्या बाष्कळ बडबडीला सुज्ञ पुणेकर अजिबात भीक घालणार नाहीत. शहराच्या हितासाठी उचललेल्या चांगल्या पावलांचे पुणेकर स्वागतच करतील, ही खात्री या महाज्ञानी महोदयांनी मनात बाळगावी, हाच त्यांना आमचा मोफत सल्ला आहे," अशा तिखट शब्दांत महापालिकेच्या सर्व खातेप्रमुखांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper