Skip to content

प्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो ‘मिस युनिव्हर्स २०२६’

भारताची काझिया लिझ मेजो पहिल्या ३० मध्ये, टॉप १२ मध्ये स्थान नाही; डोमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ पहिली उपविजेती

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 min read

प्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो ‘मिस युनिव्हर्स २०२६’
भारताची काझिया लिझ मेजो पहिल्या ३० मध्ये, टॉप १२ मध्ये स्थान नाही; डोमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ पहिली उपविजेती

सॅन जुआन : प्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो हिने ‘मिस युनिव्हर्स २०२६’चा किताब पटकावला. प्यूर्टो रिकोची राजधानी सॅन जुआन येथे झालेल्या ७५व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत तिच्या डोक्यावर मुकुट ठेवण्यात आला. डोमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ पहिली, व्हेनेझुएलाची क्लारा वेगास गोएट्झ दुसरी, तर फिलिपिन्सची बी मिलान-विंडोर्स्की तिसरी उपविजेती ठरली. भारताचे प्रतिनिधित्व करणारी केरळची १९ वर्षीय काझिया लिझ मेजो पहिल्या ३० स्पर्धकांपर्यंत पोहोचली. मात्र, तिला पहिल्या १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवता आले नाही.

यंदा जगभरातील ११६ देश आणि प्रदेशांतील स्पर्धकांमध्ये या किताबासाठी चुरस होती. ‘मिस युनिव्हर्स २०२५’ची विजेती मेक्सिकोची फातिमा बॉश हिने नव्या विजेतीला मुकुट प्रदान केला.

३,१५० हिऱ्यांचा मुकुट

स्पर्धेच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त विजेतीसाठी खास मुकुट तयार करण्यात आला होता. १८ कॅरेट पांढऱ्या सोन्यापासून (व्हाइट गोल्ड) बनवलेल्या या मुकुटात ३,१५० हिरे जडवले आहेत.

काझियाचा प्रवास पहिल्या ३० पर्यंत

ग्रँड फिनालेच्या पहिल्या फेरीत काझियाने उपस्थितांसमोर स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर तिने पहिल्या ३० स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. पुढच्या फेरीत मात्र पहिल्या १२ जणींमध्ये तिचे नाव आले नाही.

अंतिम पाच जणींना एकच प्रश्न

फिलिपिन्सची बी मिलान-विंडोर्स्की, न्यूझीलंडची जॉर्जिया वॅडिंग्टन, व्हेनेझुएलाची क्लारा वेगास गोएट्झ, डोमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ आणि प्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो या पाच जणी अंतिम फेरीत पोहोचल्या. ‘सध्या जगाला आपल्या नेत्यांकडून सर्वांत जास्त कशाची गरज आहे?’ हा प्रश्न अंतिम फेरीत पाचही जणींना विचारण्यात आला.

सहा देशांचे स्पर्धक बाहेर

अंतिम फेरीपूर्वीच ही स्पर्धा अनेक वादांमुळे चर्चेत होती. थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, सिंगापूर आणि मलेशिया या आग्नेय आशियातील सहा देशांच्या स्पर्धकांना यंदा स्पर्धेत सहभागी होता आले नाही. ‘मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन’ आणि थायलंडमधील सौंदर्य स्पर्धा आयोजक नवात इतसाराग्रिसिल यांच्यात फ्रँचायझी अधिकार आणि करारांवरून वाद आहे. नवात इतसाराग्रिसिल हे या देशांतील राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धांशी संबंधित होते. या वादामुळे संबंधित देशांच्या स्पर्धकांना स्पर्धेतून वगळण्यात आले. यातील काही देशांत राष्ट्रीय विजेत्यांची निवडही झाली होती. आफ्रिकेतील काही देशांच्या स्पर्धकांना अमेरिकेचा व्हिसा न मिळाल्याने त्यांनाही माघार घ्यावी लागली.

व्हिएतनामच्या विजेतीचा किताब काढला

न्गुयेन क्विन आन हिने २ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मिस युनिव्हर्स व्हिएतनाम’चा किताब जिंकला होता. मात्र, ४७ दिवसांनंतर, १८ नोव्हेंबरला आयोजकांनी तिचा मुकुट काढून घेतला. १२ ऑक्टोबरला एका कथित खासगी ग्रुप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. त्यात स्पर्धक, परीक्षक आणि सौंदर्य स्पर्धेशी संबंधित इतर व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी होती. या चॅटमध्ये क्विन आन आणि पहिली उपविजेती त्रिन माय आन यांची नावे होती. त्यानंतर दोघींनीही जाहीर माफी मागितली.

आयोजकांनी क्विन आनवर सहा महिन्यांची बंदी घालून तिला कोणत्याही मंचावरील सादरीकरणात भाग घेण्यास मनाई केली आणि दंडही ठोठावला. त्यानंतर तिने परवानगीशिवाय इतर कार्यक्रमांत भाग घेतला आणि व्यवस्थापन करारावर स्वाक्षरी केली नाही, असा आरोप आयोजकांनी केला. या कारणांवरून तिचा किताब काढून घेण्यात आला.

https://epaper.maharashtramirror.com/

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper