Skip to content

पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; सात जणांना अटक, दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

बिबवेवाडीतील आरोपींचा पुणे, बीड आणि लातूरमध्ये शोध; कोंढवा बुद्रुक येथील हल्ल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 min read

पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला
सात जणांना अटक, दोन विधिसंघर्षग्रस्त बालके ताब्यात

पुणे, महाराष्ट्र मिरर : हद्दीत वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुण्यासह बीड आणि लातूर जिल्ह्यांत तपासमोहीम राबवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी हद्दीतील वर्चस्वाच्या वादातून एका व्यक्तीला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या मारहाणीचा सूड घेण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. नियोजनानुसार हल्ला करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात होता. तो मिळून न आल्याने त्याचा भाऊ साळवे गार्डन येथील वॉशिंग सेंटरजवळ, कोंढवा बुद्रुक परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर मित्रासोबत बसलेला असताना आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक करांडे यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला. पोलीस अंमलदार अभिजीत जाधव आणि विजय खेंगरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रतन विवस खत्री (वय २४) आणि आकाश सायबान जमादार (वय १९), दोघेही रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे, हे एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह एका बंद असलेल्या घरात लपून बसल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले.

दरम्यान, पोलीस अंमलदार गणेश चिंचकर आणि उमेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार बंटी राजेश म्हस्के (वय २५), सोमा रमेश गायकवाड (वय २०) आणि धीरज दामोदर कांबळे (वय २४), तिघेही रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे, हे बीड जिल्ह्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्यासह पोलीस अंमलदार महेश बेदुगडे, गणेश चिंचकर आणि विजय खेंगरे यांचे पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले. केज आणि आंबेजोगाई परिसरात शोध घेतल्यानंतर आरोपी तेथून पुढे निघून गेल्याची माहिती मिळाली. अधिक तपासातून ते लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे शोध घेऊन तिघांनाही जेरबंद केले.

याशिवाय, पोलीस अंमलदार किशोर पवार आणि मयूर मोरे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संध्या ऊर्फ संघर्ष गोरख सावंत (वय २०, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याला ताब्यात घेतले. तसेच पोलीस अंमलदार सुजित मदन यांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले.

या प्रकरणातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे करीत आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे आणि पोलीस अंमलदार महेश बेदुगडे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, अमित बधे, उमेश पाटील, विजय खेंगरे, अनिल बनकर, रुपेश पाटील, सुजित मदन, मयूर थोरात, किशोर पवार आणि मयूर मोरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper