पुण्यात रुग्ण हक्क परिषदेचा २४ नोव्हेंबरला भव्य निर्धार मेळावा
औषध सुरक्षा कायदा आणि मोफत उपचारांचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी; हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
1 min read

पुणे : रुग्णांना सुरक्षित औषधे मिळावीत तसेच आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी, (दि. २४) सकाळी ११ वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे हा मेळावा पार पडणार आहे.
अन्नसुरक्षा कायद्याच्या धर्तीवर देशात औषध सुरक्षा कायदा लागू करण्यात यावा, ही या मेळाव्यातील प्रमुख मागणी आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळण्याची हमी देणारा स्वतंत्र रुग्ण हक्क संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणीही परिषदेकडून करण्यात येत आहे. औषधांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि आरोग्यसेवेचा वाढता खर्च लक्षात घेता रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ठोस कायदेशीर तरतुदी असणे आवश्यक असल्याची भूमिका परिषदेमार्फत मांडण्यात येणार आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेशातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या मागण्यांना व्यापक जनसमर्थन मिळावे आणि रुग्णांच्या हक्कांसाठी एकजूट निर्माण व्हावी, यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०६०६६०६१.

Maharashtra Mirror




