Skip to content

पुण्यात रिक्षाचालकांचा संप प्रवाशांचे हाल;लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

पुण्यात रिक्षाचालकांचा संप प्रवाशांचे हाल
लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

पुणे, महाराष्ट्र मिरर : बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रिक्षाचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या संपाचा परिणाम शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला असून अनेक ठिकाणी प्रवाशांना रिक्षांसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.

बाईक टॅक्सी सेवांमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे. बाईक टॅक्सी सेवांवर नियंत्रण आणावे तसेच नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या सेवांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक रिक्षाचालकांनी केली. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका संघटनांनी मांडली. या आंदोलनादरम्यान रिक्षाचालकांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. बाईक टॅक्सी सेवांना परवानगी देताना पारंपरिक रिक्षाचालकांच्या रोजगाराचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, रिक्षा संपामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रेल्वे तसेच बसस्थानकांवर जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. बाईक टॅक्सी आणि रिक्षा व्यवसायातील संघर्षामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper