पुण्यात पोलिओ लसीकरणाला ९०.२ टक्के प्रतिसाद
दोन लाख ८५ हजार बालकांना पोलिओचे डोस; उर्वरित बालकांसाठी आजपासून घरोघरी लसीकरण
2 min read

पुणे, दि. २३ : शहरात राबविण्यात आलेल्या विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २२) दिवसभरात पाच वर्षांखालील दोन लाख ८५ हजार ३६९ बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. शहरातील एकूण उद्दिष्टाच्या ९०.२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप लसीकरण न झालेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सोमवारपासून (दि. २३) घरोघरी भेटी देणार आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या मोहिमेसाठी शहरातील पाच वर्षांखालील तीन लाख १६ हजार २७५ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी चार लाख पोलिओ लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला होता. शहरभरात एक हजार ३६७ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली.
नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील बालकांना संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत डोस देण्यात आले. तसेच प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या बालकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी ट्रान्झिट पोलिओ बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. नियमित लसीकरण केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या बालकांसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्वारगेट येथील ट्रान्झिट पोलिओ बूथला भेट देऊन मोहिमेच्या कामकाजाची पाहणी केली. स्वारगेट हे प्रवाशांची मोठी वर्दळ असलेले ठिकाण असल्याने येथे प्रवासादरम्यान येणाऱ्या बालकांनाही पोलिओ लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बूथवरील व्यवस्थेची माहिती त्यांनी घेतली.
मोहिमेदरम्यान डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी सोमवारपासून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरण करणार आहेत. पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य द्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Maharashtra Mirror




