पुण्यात पाच दिवसांत ५० अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेचा हातोडा
कोंढवा आणि वानवडीत धडक कारवाई; अनधिकृत होर्डिंग्जधारकांमध्ये खळबळ
2 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गेल्या पाच दिवसांत शहरातील एकूण ५० अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यात आले असून, कोंढव्यातील वेलकम चौक आणि वानवडीतील संविधान चौक परिसरात महापालिकेने विशेष मोहीम राबवली. या धडक मोहिमेमुळे अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शनिवारी (२१ नोव्हेंबर) रात्री ११ वाजल्यापासून रविवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजेपर्यंत अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात तीव्र कारवाई करण्यात आली. रात्रभर चाललेल्या या मोहिमेत एकूण १३ अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वानवडीतील संविधान चौक परिसरातील रहदारीला अडथळा ठरणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणारे जाहिरात फलक या कारवाईत हटवण्यात आले.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप कदम आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कोंढव्यातील वेलकम चौक तसेच वानवडीतील संविधान चौक परिसरातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पथकाने वेगाने पूर्ण केली. रविवारी दुपारपर्यंत कोंढव्यातील वेलकम चौक परिसरात कारवाई सुरू असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांत महापालिकेने शहराच्या विविध भागांत मोहीम राबवून एकूण ५० अनधिकृत होर्डिंग्ज हटवले आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांच्या परिसरात महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज उभारले जात असल्याचे निदर्शनास आले होते. या फलकांमुळे शहराच्या विद्रुपीकरणाचा प्रश्न निर्माण होण्यासोबतच वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत होता.
शहरात अनधिकृत होर्डिंग्जच्या कारवाईबाबत यापूर्वी विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात होते. १ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत आकाशचिन्ह व परवाना विभागाने केवळ ७८ अनधिकृत होर्डिंग्ज हटवल्याची आकडेवारी समोर आली होती, तसेच काही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाईची गती कमी असल्याची चर्चा होती. मात्र, आता प्रशासनाने थेट मैदानात उतरून पाच दिवसांत ५० होर्डिंग्ज हटवत कारवाईला वेग दिल्याचे चित्र आहे.
यापूर्वीही महापालिका आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनर्सविरोधात कडक भूमिका घेत दोषींवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. अनधिकृत जाहिरात फलक उभारणाऱ्यांसह ते छापणाऱ्या आणि लावणाऱ्यांवरही कारवाईचे संकेत देण्यात आले होते.
आगामी काळातही कारवाई सुरूच राहणार
सध्या सुरू असलेल्या धडक मोहिमेमुळे कोंढवा, वानवडीसह शहरातील इतर भागांतील अनधिकृत होर्डिंग्जधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहराचे सौंदर्य टिकवणे, नियमबाह्य फलकांना आळा घालणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुव्यवस्थित रस्ते उपलब्ध करून देणे, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी काळातही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, अनधिकृत होर्डिंग्ज आढळल्यास तत्काळ निष्कासनाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




