पुणे ग्रँड टूरच्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; कर्वेनगरमध्ये हातानेच निघाले डांबर
कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही निकृष्ट दर्जाचे काम
3 min read

पुणे, महाराष्ट्र मिरर : आगामी 'पुणे ग्रँड टूर २०२७' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून शहरातील सुमारे १३५.८ किलोमीटर रस्त्यांच्या सुधारणेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. कर व इतर बाबींसह या प्रकल्पासाठी तब्बल १६७.२५ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असताना, कर्वेनगर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी करण्यात आलेले डांबरीकरण दुसऱ्याच दिवशी दुपारी हाताने घासल्यावर निघत असल्याचे निदर्शनास आले असून, सामाजिक कार्यकर्ते राजीव पाटील यांनी या कामाच्या दर्जावर आणि कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, कर्वेनगरमध्ये मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास डांबरीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर अवघ्या सोळा तासांतच, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता पाहणी केली असता, हाताने साधे घासल्यानंतरही डांबरासह खडीचा थर सहज उखडून निघत असल्याचे समोर आले आहे. काम पूर्ण होऊन काही तास उलटल्यानंतरही डांबर रस्ता पकडून ठेवत नसेल, तर वापरलेल्या साहित्याच्या आणि कामाच्या तांत्रिक गुणवत्तेबाबत मोठा संशय निर्माण होत असल्याचा आरोप राजीव पाटील यांनी केला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने या संपूर्ण कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पेव्हर ब्लॉकवर डांबरीकरणाचा अजब प्रकार
केवळ डांबराचा निकृष्ट दर्जाच नव्हे, तर पेव्हर ब्लॉकवर थेट डांबरीकरण करण्याच्या पद्धतीवरही पाटील यांनी बोट ठेवले आहे. तांत्रिकदृष्ट्या ज्या ठिकाणी डांबरीकरण करणे शक्य नसते किंवा अडचणीचे ठरते, तिथे पेव्हर ब्लॉक बसवले जातात. असे असताना या पेव्हर ब्लॉकवर थेट डांबराचा थर टाकण्याचा निर्णय कोणत्या तांत्रिक निकषांवर आणि कोणाच्या मंजुरीने घेण्यात आला? महापालिकेच्या मंजूर निविदा आराखड्यात या कामाची नेमकी काय तरतूद आहे? असे थेट सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी महापालिकेने शहरातील १३५.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे चार स्वतंत्र पॅकेजमध्ये विभागली आहेत. या चारही पॅकेजचा एकत्रित मूळ खर्च १४०.७३ कोटी रुपये असून, जीएसटी व इतर खर्चासह हा आकडा १६७.२५ कोटींवर पोहोचला आहे.
पॅकेज १ (३४.०१ कोटी) : औंध, बाणेर, पाषाण, विद्यापीठ परिसर आणि रेंज हिल्स.
पॅकेज २ (३४.२९ कोटी) : सेनापती बापट रोड, कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रोड, पर्वती, सारसबाग आणि खडकवासला.
पॅकेज ३ (३६.५३ कोटी) : मध्यवर्ती पेठा, अलका टॉकीज, टिळक रोड, बाजीराव रोड, शिवदर्शन, गंगाधाम, कोंढवा, भवानी पेठ, कॅम्प आणि येवलेवाडी.
पॅकेज ४ (३५.९० कोटी) : भैरोबा नाला, बी. टी. कवडे रोड, मगरपट्टा, मुंढवा, नॉर्थ मेन रोड, विधान भवन, एफ. सी. रोड, डेक्कन आणि बालगंधर्व परिसर.
यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या पहिल्या पुणे ग्रँड टूर स्पर्धेनंतर शहरातील अनेक रस्त्यांवर अल्पावधीतच खड्डे पडल्याच्या तसेच पुन्हा खोदकाम झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यंदा १० वर्षांच्या हमीसह रस्ते विकसित केले जात असल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी प्रत्यक्ष कामाची सुरुवातच अशा प्रकारे होत असल्याने रस्त्यांच्या टिकाऊपणाबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फायदा केवळ काही दिवसांपुरता मर्यादित न राहता सामान्य पुणेकरांना कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कर्वेनगरमधील या प्रकाराची महापालिका प्रशासन दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणार का आणि कामाचे त्रयस्थ तांत्रिक परीक्षण केले जाणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुणे ग्रँड टूरच्या नावाखाली १६७ कोटी रुपयांहून अधिक सार्वजनिक पैसा खर्च केला जात आहे. हा पैसा सामान्य पुणेकरांच्या करातून येतो. काल रात्री बारा वाजता केलेले डांबरीकरण आज दुपारी चार वाजता हाताने निघत असेल, तर हा थेट नागरिकांच्या पैशांच्या अपव्ययाचा प्रश्न आहे. पेव्हर ब्लॉकवर डांबरीकरण करण्याची गरज काय आणि त्याला तांत्रिक मंजुरी कोणी दिली? आम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेला विरोध नाही; पण स्पर्धेच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेतली जाणार नाही. आधी कामाचा दर्जा सिद्ध करा, मगच कंत्राटदारांची बिले मंजूर करा. हा पुणेकरांचा कष्टाचा पैसा आहे, कोणाच्या बापाची मालमत्ता नाही.
- राजीव पाटील, सामाजिक कार्यकर्ते
https://epaper.maharashtramirror.com

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




