पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; जनतेकडून जाहीरनाम्यासाठी मागवल्या सूचना!
अमली पदार्थांचे जाळे, गुंडगिरी आणि भ्रष्टाचारावर भाजपचा भर; डिसेंबरच्या मध्यापर्यंत संकल्पपत्र प्रसिद्ध करण्याचे नियोजन
1 min read

चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा तयार करण्याकरिता भाजपने राज्यभर जनसंपर्क मोहीम सुरू केली असून, नागरिकांकडून सूचना आणि अपेक्षा मागवण्यात येत आहेत. या जाहीरनाम्याला ‘जनतेचे व्हिजन डॉक्युमेंट’ असे स्वरूप देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवल सिंग ढिल्लों यांनी रविवारी या मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी नागरिकांना आपल्या सूचना थेट पक्षापर्यंत पोहोचवता याव्यात, यासाठी तीन दूरध्वनी क्रमांक आणि क्यूआर कोड जारी करण्यात आला. तसेच गावागावांत आणि शहरांमध्ये विशेष प्रचार वाहने पाठवून नागरिकांच्या सूचना संकलित केल्या जाणार आहेत.
अमली पदार्थांचे वाढते व्यसन, गुंडगिरी, भ्रष्टाचार, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि राज्यावरील वाढते कर्ज हे भाजपच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे असणार आहेत. पंजाबला अमली पदार्थमुक्त करणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि राज्याचा विकास साधणे हे पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ढिल्लों यांनी सांगितले. भाजपच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या अपेक्षा आणि सूचनांचा विचार करून संकल्पपत्र तयार केले जाणार आहे. माजी मंत्री मनप्रीत सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील समिती प्राप्त सूचनांची छाननी करणार आहे. भाजपचे हे व्हिजन डॉक्युमेंट डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. आगामी निवडणुकीत ११७ विधानसभा मतदारसंघांमध्ये लढण्याची तयारी असल्याचेही प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




