Skip to content

‘नको घड्याळ, नको तुतारी’; राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्यास रोहित पवारांची स्वतंत्र भूमिका?

काँग्रेस प्रवेशासह पर्यायी राजकीय समीकरणांची चाचपणी; विदर्भातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क असल्याची चर्चा

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार

मुंबई, महाराष्ट्र मिरर - शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला आहे. या संभाव्य राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भविष्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन स्वतंत्र पर्यायांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. पक्षाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास आपण कोणती भूमिका घ्यायची, याबाबत त्यांनी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित पवार हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा किंवा स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याचा पर्याय तपासत आहेत. पक्षातील भाजपविरोधी विचारांचे नेते, माजी आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचा संभाव्य एनडीए प्रवेश झाल्यास कोणते नेते आपल्यासोबत राहू शकतात, याचा अंदाज घेतला जात असल्याची चर्चा आहे.

विदर्भातील नेत्यांवर विशेष लक्ष

रोहित पवार यांच्या राजकीय हालचालींमध्ये विदर्भातील जिल्ह्यांना विशेष महत्त्व दिले जात असल्याचे वृत्त आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि अकोला या जिल्ह्यांतील स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

याशिवाय, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवार यांनी ९ नोव्हेंबर रोजी प्रतिक्रिया देताना पक्षात विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील भूमिकेबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की स्वतंत्र राजकीय वाट निवडणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संभाव्य राजकीय समीकरणांमुळे पक्षांतर्गत कोणते बदल घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror