Skip to content

धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त; एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; नांदेड सिटी पोलिसांकडे दोघांना सुपूर्द

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

धायरीत दोन धारदार लोखंडी कोयते जप्त
एक आरोपी जेरबंद, विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

पुणे, महाराष्ट्र मिरर : धायरी गावातील बेनकर वस्ती परिसरात धारदार लोखंडी हत्यारे घेऊन बसलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने पकडले. त्यांच्याकडून दोन लोखंडी धारदार कोयते जप्त करण्यात आले असून, हेमंत पुरुषोत्तम वाणी (वय १८ वर्षे १० महिने, रा. धायरी, पुणे) याला जेरबंद करण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२२ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३चे पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार नऱ्हे आणि नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे आरोपींचा शोध, अवैध धंद्यांची तपासणी आणि गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त घालत होते. यावेळी धायरी गावातील बेनकर वस्ती परिसरात पोलीस अंमलदार मनोज पवार आणि अमित बोडरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम धायरेश्वर मंदिराजवळील शिवभैरव कुस्ती आखाड्याच्या मैदानात बसले असून, त्यांच्याकडे दोन लोखंडी धारदार कोयते आहेत. त्यानंतर पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. बातमीदाराने दिलेल्या वर्णनाशी जुळणारे दोन इसम मैदानात आढळले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले.

चौकशीदरम्यान त्यांची नावे हेमंत पुरुषोत्तम वाणी आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लोखंडी धारदार कोयते जप्त केले. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांनाही नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार अतुल साठे, पुरुषोत्तम गुनला, योगेश झेंडे आणि तुषार किंद्रे यांनी ही कारवाई केली.

https://epaper.maharashtramirror.com/

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper