दुरंतो एक्स्प्रेसवर पुन्हा दगडफेक; प्रवासी सुखरूप
नागपुरातील अजनी स्थानकाजवळची घटना
1 min read

नागपूर, प्रतिनिधी : नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या नागपूर-सीएसएमटी दुरंतो एक्स्प्रेसवर सोमवारी रात्री पुन्हा दगडफेक करण्यात आली. अजनी रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर मनीषनगर परिसरात अनोळखी व्यक्तीने गाडीच्या ए-२ वातानुकूलित डब्यावर दगड भिरकावला. या घटनेत खिडकीची बाहेरील काच फुटली. मात्र, आतील काच सुरक्षित राहिल्याने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
दगडफेकीनंतरही गाडीच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला नाही. दुरंतो एक्स्प्रेस नियोजित मार्गाने पुढे रवाना झाली. वर्धा रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक कर्मचाऱ्यांनी खिडकीच्या नुकसानीची तात्पुरती दुरुस्ती केली. या घटनेतील संशयिताचा शोध सुरू असून, पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक होण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी २५ सप्टेंबर रोजी बोरखेडी रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस (१२२९०) वर दगडफेक झाली होती. त्यावेळी ए-१, बी-२ आणि बी-५ या तीन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या.

Maharashtra Mirror




