तीन आमदारांच्या हत्येच्या कटाचा आरोप; संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
‘२०२२ मधील घटना, आता तो विषय संपला’; मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, राऊतांवरही निशाणा
2 min read

मुंबई, महाराष्ट्र मिरर : शिवसेनेतील फुटीच्या काळात तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही २०२२ मधील जुनी घटना असून, आता त्यावर पुन्हा चर्चा करण्यात अर्थ नाही. आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचे 'रामनाम सत्य' होणार होते, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, शिवसेनेतील फुटीच्या काळात तीन आमदारांना संपवण्याचा कट आखण्यात आला होता, असा दावा केला. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
राऊत यांच्या आरोपांवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, "ती जुनी बातमी आहे. २०२२ मधील घटना असून, तो प्रकार आता संपला आहे. त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. संजय राऊत यांना पाच-दहा किलोमीटर पुढचे दिसत असते. त्यामुळे त्यांच्या विधानावर वाद घालणे योग्य नाही. आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे."
दरम्यान, याच संवादात शिरसाट यांनी इतर राजकीय विषयांवरही भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद असल्याच्या चर्चांवर सावध भूमिका घेतली. तसेच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना वादग्रस्त विधाने टाळण्याच्या सूचना दिल्या असून, कमी बोलून अधिक काम करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाकडून हा विषय जुना असल्याचे सांगण्यात आले असले, तरी तीन आमदारांच्या हत्येच्या कटाबाबत राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाची राजकीय चर्चा पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

Maharashtra Mirror




