Skip to content

तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन संतापले

हातात झाडू घेत स्वतः केली स्वच्छता

SK
Smita Kulkarni

1 min read

तहसील कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन संतापले
गिरीश महाजन

जळगाव : शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि शिस्त राखण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असतानाही कार्यालयांच्या परिसरात अस्वच्छता असल्याचे चित्र समोर येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात असाच प्रकार पाहायला मिळाला. कार्यालयातील अस्वच्छता पाहून मंत्री गिरीश महाजन चांगलेच संतापले. त्यांनी थेट हातात झाडू घेत स्वतःच कार्यालयाची स्वच्छता केली.

पत्रकार परिषदेसाठी मंत्री गिरीश महाजन तहसील कार्यालयात पोहोचले असता, त्यांना परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ, भिंतींवर जाळी आणि कोळीष्टके साचल्याचे दिसून आले. कार्यालयातील अस्वच्छतेमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, कार्यालयातील स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्याही आढळून आल्या. या प्रकारामुळे महाजन यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

कार्यालयातील अस्वच्छता पाहून केवळ नाराजी व्यक्त न करता महाजन यांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता करण्यास सुरुवात केली. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे अस्वच्छता आढळणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शासकीय कार्यालये ही नागरिकांसाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे तेथील स्वच्छता, शिस्त आणि कामकाजाचा दर्जा राखण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. या घटनेनंतर जामनेर तहसील कार्यालयातील स्वच्छतेचा प्रश्न चर्चेत आला असून, वरिष्ठ अधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Share