Skip to content

ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल; मुख्यालयातून कर्मचारी व नागरिकांना तातडीने बाहेर काढले

• पाचपाखाडी येथील चंदनवाडी परिसरातील महापालिका मुख्यालयाला गुरुवारी दुपारी धमकीचा संदेश प्राप्त; नौपाडा पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत सर्व विभागांची कसून तपासणी सुरू

PS
Piyusha Sawant

1 min read

ठाणे महापालिकेला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल

ठाणे :- बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर आता ठाणे महानगरपालिकेलाही बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी महापालिकेच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्याचा धमकीचा संदेश येताच प्रशासकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला. या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षा यंत्रणांनी तातडीने पावले उचलत मुख्यालयातील सर्व कर्मचारी आणि कामासाठी आलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढले आहे.

चंदनवाडी येथील मुख्यालयाला धमकीचा ई-मेल; इमारत केली रिकामी

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय पाचपाखाडी येथील चंदनवाडी परिसरात आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास महापालिकेचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला. या धमकीच्या संदेशाची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यालयातील विविध मजल्यांवर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या सर्व नागरिकांना तातडीने इमारतीबाहेर काढण्यात आले.

नौपाडा पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी; सर्व विभागांची कसून तपासणी

बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने महापालिका मुख्यालयात दाखल झाले. सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मुख्यालयातील सर्व कार्यालये आणि विविध विभागांची बारकाईने तपासणी (सर्च ऑपरेशन) सुरू आहे. सकाळीच मुंबई महापालिकेला धमकीचा ई-मेल आल्याची घटना ताजी असतानाच दुपारी ठाणे महापालिकेलाही तशाच प्रकारची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हान वाढले असून, या ई-मेलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे.

Share