Skip to content

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : मुंबई ते नेपाळ कनेक्शन समोर; बिश्नोई टोळीच्या हत्येच्या कटामधील धक्कादायक खुलासे

हल्ल्यापूर्वी आरोपी 3 ते 4 दिवस नेपाळमध्ये थांबल्याचे तपासात उघड; गुन्ह्यानंतर पळून जाण्याचा आणि सुरक्षित ठिकाणाचा कट

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण
मुंबई ते नेपाळ कनेक्शन समोर; बिश्नोई टोळीच्या हत्येच्या कटामधील धक्कादायक खुलासे

मुंबई :- अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात मुंबई गुन्हे शाखेला (Mumbai Crime Branch) आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. या प्रकरणाचे थेट ‘मुंबई ते नेपाळ’ कनेक्शन समोर आले असून, लॉरेंस बिश्नोई टोळीने रचलेल्या या कटात आरोपी हल्ल्यापूर्वी नेपाळमध्ये लपून बसले होते आणि गोळीबारानंतर त्याच मार्गाने पसार होण्याचा त्यांचा बेत होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.

नेपाळमधील अड्डा आणि पळून जाण्याची योजना

तपासातील माहितीनुसार, लॉरेंस बिश्नोई टोळीशी संबंधित आरोपींसाठी नेपाळमध्ये लपण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी आरोपी 3 ते 4 दिवस नेपाळमध्ये थांबले होते.

आरोपींनी चौकशीत दिलेल्या कबुलीनुसार, आधी त्यांना नेपाळमध्ये नेण्यात आले होते आणि लक्ष्यावर गोळीबार केल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने नेपाळला परत यायचे, अशी सूचना त्यांना देण्यात आली होती. नेपाळमधून टोळीतील इतर संपर्कांच्या माध्यमातून त्यांना दुसऱ्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना होती, जेणेकरून भारतीय तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत.

जुहू परिसरातील फुटबॉल मैदानाबाहेर घडली होती घटना; पळून जाताना तिघांना कोटा पोलिसांनी घेतले होते ताब्यात

जुहू परिसरात फुटबॉलचा सामना खेळून टायगर श्रॉफ मैदानाबाहेर पडत असताना त्यांच्या वाहनावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत टायगर श्रॉफ सुखरूप बचावले होते, मात्र त्यांच्या चालकासह एक जण जखमी झाला होता. हल्ल्यादरम्यान दोन शस्त्रांमधून गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यातील एक शस्त्र जाम झाल्याचेही तपासात पुढे आले.

हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना या प्रकरणातील मुख्य संशयित ऋतिक कुमार, फूलसिंह नरेश आणि रेहान अंसारी उर्फ सुक्का यांना कोटा पोलिसांनी अटक केली होती. या तपासाच्या साखळीतूनच बिश्नोई टोळीच्या नेटवर्कचा आणि नेपाळमार्गे पळून जाण्याच्या कटाचा उलगडा झाला आहे. आर्थिक सूत्रधारावर ‘लूकआऊट नोटीस’ आणि तपास सुरू ; अभिषेक पंडितविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी; परदेशात पळून जाण्याच्या शक्यतेने यंत्रणा सतर्क

या कटातील आर्थिक व्यवहार आणि निधी पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या संशयिताविरोधातही मुंबई गुन्हे शाखेने कारवाई तीव्र केली आहे. बिश्नोई टोळीचा कथित आर्थिक सूत्रधार मानला जाणारा अभिषेक पंडित देश सोडून पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याच्याविरोधात ‘लूकआऊट सर्क्युलर’ (LOC) जारी करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपी आणि नेटवर्कचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper