गोकुळच्या सत्ता संघर्षावर ३ डिसेंबरला पुन्हा सुनावणी
१२ संचालक आणि चार शासननियुक्त संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश
2 min read

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला राजकीय आणि कायदेशीर संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अध्यक्ष निवडीत शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर २५ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली. यावेळी काही संचालकांना अद्याप नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या महायुतीच्या वकिलांना न्यायालयाने खडे बोल सुनावले. सुनावणी टाळण्यासाठी वेळकाढूपणा केला जात आहे का, असा सवाल करत न्यायालयाने सर्व संबंधित संचालकांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
२५ नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून मूळ याचिकेत आवश्यक दुरुस्त्या करण्याची परवानगी मागण्यात आली. याचिका दाखल झाल्यानंतर गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड आणि मतदान प्रक्रियेदरम्यान घडलेल्या नव्या घटनांची नोंद न्यायालयाच्या रेकॉर्डवर घेण्याची विनंतीही करण्यात आली.
या मागणीला महायुतीच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने समविचारी आघाडीला मूळ याचिकेत आवश्यक दुरुस्ती करण्याची परवानगी दिली. त्याचवेळी आतापर्यंत घडलेल्या घटना आणि अध्यक्षपदाची निवड यासंदर्भातील निर्णय अंतिम निकालाच्या अधीन राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अंतिम निकालापर्यंत कायदेशीर अनिश्चितता कायम आहे.
सुनावणीवेळी महायुतीच्या वकिलांनी काही संचालकांना न्यायालयाची नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर महायुतीच्या पॅनेलमधील १२ संचालक आणि शासननियुक्त चार संचालक अशा एकूण १६ जणांना सर्व उपलब्ध माध्यमांतून नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. ही प्रक्रिया गोकुळ प्रशासनामार्फत पूर्ण केली जाणार आहे.

Maharashtra Mirror




