Skip to content

गुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात जिवंत फेकले; तिघांचे मृतदेह सापडले, 13 वर्षीय मुलगा बचावला तर दोन मुले अद्याप बेपत्ता

महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात उकाई-काकरापार कालव्यात आढळले तीन मृतदेह; जळगावच्या एरंडोल येथील कुटुंबावर काळाचा घाला

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

गुजरातमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात जिवंत फेकले
तिघांचे मृतदेह सापडले, 13 वर्षीय मुलगा बचावला तर दोन मुले अद्याप बेपत्ता

सुरत :- गुजरातमधील सुरत जिल्ह्याच्या बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळून जाणाऱ्या कालव्यात महाराष्ट्रातील एका कुटुंबाला जिवंत फेकल्याची अत्यंत क्रूर आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आई-वडिलांसह एका मुलीचा मृतदेह कालव्यात आढळून आला असून, 13 वर्षीय मुलगा चमत्कारिकरीत्या बचावला आहे. संबंधित कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून, कुटुंबातील आणखी दोन मुले अद्याप बेपत्ता असल्याने या संपूर्ण प्रकरणाभोवती मोठे गूढ निर्माण झाले आहे.

कसा घडला संपूर्ण थरार? पाईप पकडून बचावला 13 वर्षीय मुलगा

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि एरंडोल येथील एका कारखान्यात काम करणारे हे कुटुंब 21 नोव्हेंबर रोजी मजुरीसाठी कारने सुरतच्या दिशेने निघाले होते. कुटुंबाची कार बारडोली तालुक्यातील उवा कालव्याजवळ पोहोचताच, दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर आरोपींनी कुटुंबातील सदस्यांना कारमधून जबरदस्तीने बाहेर काढून कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिले, असा आरोप करण्यात आला आहे.

कालव्यात फेकण्यात आलेल्या सदस्यांपैकी 13 वर्षीय मुलाच्या हाताला पाण्यात एक पाईप लागला. त्याचा आधार घेत या मुलाने आपला जीव वाचवला आणि थरथर कापत कालव्याबाहेर येण्यात यश मिळवले. त्यानंतर त्याने जवळच्या एका हॉटेलमध्ये धाव घेत घडलेला संपूर्ण थरारक प्रकार सांगितला आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.

महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात सापडले मृतदेह; नितीन ऊर्फ भुरिया पाटील व कविता पाटील अशी मृतांची ओळख पटली

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कालव्यात तातडीने शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात उकाई-काकरापारच्या कालव्यात एक पुरुष, एक महिला आणि एका मुलीचे असे तीन मृतदेह आढळून आले. कुटुंबीयांनी या मृतदेहांची ओळख पटवली असून, मृत वडिलांची ओळख नितीन ऊर्फ भुरिया पाटील अशी, तर मृत महिलेची ओळख कविता पाटील अशी झाली आहे. पोलीस तपासात समोर आले आहे की, कविता पाटील यांच्या पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर त्या नितीन ऊर्फ भुरिया पाटील यांच्यासोबत राहत होत्या. या घटनेतील आणखी दोन मुले अद्याप बेपत्ता असून, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

हत्येचा संशय; आरोपींच्या शोधासाठी आठ स्वतंत्र पथके तैनात

आरोपींचे या कुटुंबाशी नेमके काय वैर होते आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा टोकाचा निर्णय का घेतला, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडिया, आबो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीसह एकूण चार जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सुरत ग्रामीण पोलिसांनी हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्या दोन मुलांचा माग काढण्यासाठी आठ स्वतंत्र पथके तयार करून सखोल तपास सुरू केला आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper