कार्लोस अल्काराझचे ऐतिहासिक यश! पहिल्यांदाच पटकावले ATP फायनल्सचे विजेतेपद
अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव; ६-२, ७-६ असा विजय मिळवत स्पेनच्या टेनिसपटूची विजेतेपदाला गवसणी
1 min read

ट्यूरिन : स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याने टेनिसविश्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रतिष्ठेच्या एटीपी फायनल्स २०२६ स्पर्धेचे पहिले विजेतेपद त्याने आपल्या नावावर केले. अंतिम सामन्यात अल्काराझने जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि जर्मनीचा स्टार टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्ह याचा ६-२, ७-६ (७-६) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. इटलीतील ट्यूरिन येथे हा अंतिम सामना पार पडला.
पहिल्या सेटपासूनच अल्काराझने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. झ्वेरेव्हला सुरुवातीपासून दबावाखाली ठेवत त्याने पहिला सेट ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेव्हने जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. टायब्रेकरमध्ये त्याने तीन सेट पॉइंट मिळवले होते. मात्र, अल्काराझने उत्कृष्ट खेळ करत हे तिन्ही सेट पॉइंट वाचवले आणि अखेर सामना जिंकला.
अल्काराझने तब्बल दोन तासांच्या लढतीनंतर हे विजेतेपद मिळवले. या विजयासह त्याने सलग १४ सामने जिंकण्याची कामगिरी केली. २०२५ मध्ये याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र त्याने विजेतेपद पटकावत त्या पराभवाची भरपाई केली. विशेष म्हणजे, करिअर ग्रँडस्लॅम आणि एटीपी फायनल्स विजेतेपद मिळवणारा अल्काराझ हा जगातील चौथा पुरुष टेनिसपटू ठरला आहे. या यशामुळे त्याच्या कारकिर्दीत आणखी एका मानाच्या विजेतेपदाची भर पडली आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




