Skip to content

कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासातून प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर: मिलिंद देवरा

दिवंगत मुरलीभाई देवरा यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याबद्दल मानले आभार

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

3 min read

कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासातून प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर: मिलिंद देवरा
दिवंगत मुरलीभाई देवरा यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याबद्दल मानले आभार

महत्त्वाचे मुद्दे

• कामाठीपुराचा सुमारे ३४ एकर क्षेत्रात समूह पुनर्विकास

• पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची घरे

• पुनर्विकास काळात आगाऊ भाडे आणि स्थलांतरासाठी २५ हजार रुपये

• आधुनिक नागरी सुविधा, उद्याने आणि व्यावसायिक जागांची निर्मिती

• म्हाडासाठी सुमारे ९०० अतिरिक्त घरांची तरतूद

• दिवंगत मुरलीभाई देवरा यांचे प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळवून देण्याचे स्वप्न साकार करण्याचा मिलिंद देवरा यांचा प्रयत्न

मुंबई: मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास करून तेथील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे, कायमस्वरूपी आणि हक्काचे घर मिळवून देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनी कामाठीपुरा विकास समितीने आयोजित केलेल्या मालमत्ताधारकांच्या विशेष बैठकीला उपस्थित राहून रहिवाशांशी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपले वडील दिवंगत मुरलीभाई देवरा यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देता येत असल्याचा आनंद आणि अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कामाठीपुरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावणे, प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देणे तसेच आधुनिक नागरी सुविधा निर्माण करणे, हा या पुनर्विकासामागील प्रमुख उद्देश असल्याचे देवरा यांनी स्पष्ट केले.

३४ एकर क्षेत्राचा समूह पुनर्विकास

कामाठीपुरा हा दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि दाट लोकवस्तीचा परिसर आहे. येथील अनेक इमारती जुन्या आणि जीर्ण झालेल्या असल्याने रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी संपूर्ण परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सुमारे ३४ एकर क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात १५ गल्लींमधील जुन्या इमारतींचा समावेश आहे. सुमारे ८ हजार रहिवासी आणि भाडेकरू, ८०० च्या आसपास मालमत्ताधारक तसेच व्यावसायिक गाळेधारक या प्रकल्पाशी संबंधित आहेत. म्हाडाला या पुनर्विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

पात्र रहिवाशांना ५०० चौरस फुटांची घरे

या प्रकल्पातील पात्र निवासी भाडेकरूंना ५०० चौरस फुटांची पुनर्वसन सदनिका देण्याचे नियोजन आहे. जुन्या आणि अरुंद घरांच्या जागी प्रशस्त घरे उपलब्ध होणार असल्याने रहिवाशांच्या राहणीमानात मोठा बदल अपेक्षित आहे.

पुनर्विकासाच्या काळात रहिवाशांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी दोन वर्षांचे आगाऊ भाडे आणि त्यानंतरच्या एका वर्षाचे भाडे धनादेशाद्वारे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच स्थलांतर आणि इतर आनुषंगिक खर्चासाठी २५ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक गाळेधारकांसाठीही जागेच्या क्षेत्रफळानुसार वाढीव मासिक भाड्याची तरतूद करण्यात आली आहे.

आधुनिक सुविधांसह कामाठीपुराचा कायापालट

पुनर्विकासात केवळ इमारती उभारण्यावर भर नसून संपूर्ण परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. नव्या निवासी इमारतींसोबत व्यावसायिक जागा, मोकळ्या जागा, उद्याने, अंतर्गत रस्ते, वाहतूक सुविधा आणि आवश्यक नागरी सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

भूकंपरोधक बांधकाम, पावसाच्या पाण्याचे संकलन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि लिफ्ट यांसारख्या सुविधांचाही प्रस्तावात समावेश आहे. याशिवाय म्हाडाला सुमारे ४४ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होणार असून त्यातून सुमारे ९०० अतिरिक्त घरे निर्माण करण्याचे नियोजन आहे.

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे आभार

मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने योगदान देता येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कामाठीपुराच्या पुनर्विकासात स्थानिक रहिवाशांचा सहभाग, त्यांच्या सूचनांचा विचार आणि पारदर्शक प्रक्रिया यांना महत्त्व देण्याची भूमिका देवरा यांनी मांडली आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper