Skip to content

कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावेत; अर्थ मंत्रालयाचे आवाहन

वेतनवाढीमुळे बाजारातील मागणी वाढून अर्थव्यवस्थेला मिळणार चालना; पंतप्रधान मोदींच्या भूमिकेला अर्थ मंत्रालयाचा पाठिंबा

Smita Kulkarni
Smita Kulkarni

1 min read

नोटा

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, असे आवाहन आता अर्थ मंत्रालयानेही केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला पगारवाढीचे आवाहन केल्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसा आल्यास बाजारातील मागणी वाढेल, ग्राहकांची क्रयशक्ती सुधारेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.

उद्योग संघटना फिक्कीच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचे आवाहन केले होते. वाढती महागाई, दैनंदिन खर्च आणि आर्थिक गरजा लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते.

पंतप्रधानांच्या या भूमिकेला पुढे नेत अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूर यांनीही कॉर्पोरेट क्षेत्राचे लक्ष वेधले. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीर्घकाळापासून अपेक्षित वाढ होत नसणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कंपन्यांनी वेतनवाढीच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पगारवाढीमुळे अर्थव्यवस्थेला फायदा

कर्मचाऱ्यांचे वेतन वाढल्यास त्यांच्या हातात खर्चासाठी अधिक पैसा उपलब्ध होईल. त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढून उत्पादन क्षेत्राला चालना मिळू शकते. वाढत्या मागणीमुळे कंपन्यांच्या व्यवसायात विस्तार होण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सरकारची अपेक्षा आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror