Skip to content

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड निविदेची चौकशी होणार; प्रताप सरनाईकांनी मागवला सविस्तर अहवाल

निविदा प्रक्रियेपासून कंत्राटदाराच्या निवडीपर्यंतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे एसटी महामंडळाला निर्देश

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

एसटी
एसटी

मुंबई, महाराष्ट्र मिरर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा सुरुवातीपासूनचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत. निविदा प्रक्रियेतील प्रशासकीय निर्णय, तांत्रिक निकष आणि कंत्राटदार कंपनीच्या निवडीसंदर्भातील सर्व कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निविदा प्रक्रियेवर उपस्थित झाले प्रश्न

NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाची अंमलबजावणी, निविदा काढण्याची पद्धत आणि कंत्राटदार कंपनीची निवड यावर प्रसारमाध्यमांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया कोणत्या निकषांनुसार राबवण्यात आली, कंपन्यांची पात्रता कशी तपासण्यात आली आणि संबंधित कंपनीची निवड कोणत्या आधारावर झाली, याची माहिती घेण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला आहे.

आर्थिक व्यवहार आणि स्मार्ट कार्डच्या किमतीचीही तपासणी

निविदा प्रक्रियेशी संबंधित प्रशासकीय मंजुरी, अटी व शर्ती, तांत्रिक आणि आर्थिक पात्रतेचे निकष, सहभागी कंपन्यांचे देकार, तांत्रिक छाननी आणि आर्थिक मूल्यमापनाचे अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच निविदा मूल्यांकन समितीचे इतिवृत्त आणि कंत्राटदार निवडीसाठी वापरण्यात आलेले निकषही मागवण्यात आले आहेत.

याशिवाय स्मार्ट कार्डची किंमत कशा पद्धतीने निश्चित करण्यात आली, महामंडळ आणि संबंधित कंपनीमधील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप काय आहे, महसूलविषयक अटी कोणत्या आहेत, याचीही माहिती मागवण्यात आली आहे. निविदा मंजुरी, कार्यादेश, करारनामा, प्रकल्पासंदर्भातील पत्रव्यवहार आणि संचालक मंडळाचे ठराव यांचाही अहवालात समावेश असणार आहे.

पारदर्शकतेसाठी अहवाल सादर करण्याचे आदेश

मागवलेली सर्व माहिती संबंधित कागदपत्रांसह संकलित करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाच्या निविदेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांची प्रशासकीय स्तरावर छाननी होणार आहे. दरम्यान, अहवाल मागवण्यात आला असला तरी निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror