Skip to content

उत्तनच्या मुर्धा खाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; १० लाखांचा मुद्देमाल नष्ट, दोन गुन्हे दाखल

१,४०० लिटर हातभट्टीची दारू आणि १९ हजार लिटर रसायन व वाहतुकीसाठी वापरली जाणारी बोटही कारवाईत जप्त

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 min read

उत्तनच्या मुर्धा खाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
१० लाखांचा मुद्देमाल नष्ट, दोन गुन्हे दाखल

भाईंदर : आगामी नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सी विभागाने भाईंदर पश्चिम येथील मुर्धा खाडी परिसरात छापा टाकून हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १,४०० लिटर तयार हातभट्टी दारू, १९ हजार लिटर रसायन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक प्लास्टिक बोट असा एकूण १० लाख १ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी मुंबई दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक (अ. व द.) प्रसाद सुर्वे आणि कोकण विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ठाणे जिल्हा-१ चे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक जे. एम. खिल्लारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुर्धा खाडी, मिठागराच्या उत्तरेस, उत्तन रोड, भाईंदर पश्चिम येथे छापा टाकला.

या छाप्यात मोठ्या प्रमाणावर तयार हातभट्टी दारू, दारूनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन आणि निर्मिती व वाहतुकीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. खाडीमार्गे हातभट्टी दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिक बोटही पथकाने ताब्यात घेतली. जप्त केलेला मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

या कारवाईत दुय्यम निरीक्षक दीपक खडसे, रत्नाकर शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे तसेच जवान भरत एडके, अमजद तडवी आणि शुभम माळी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक जे. एम. खिल्लारे करीत आहेत.

दरम्यान, आगामी डिसेंबर महिना आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अवैध मद्यनिर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम तीव्र केली आहे. अशा अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी विभागाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Share
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper