Thane Crime News : भूमी अभिलेखचा उप अधीक्षक आणि भुकरमापक यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई

•शासकीय प्रलंबित कामे आणि जमीन मोजणी करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
ठाणे :- शासकीय प्रलंबित कामाच्या अनुषंगाने तसेच जमिनीची मोजणी करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक आणि भूकरमापक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहाथ पकडले आहे. चांगदेव गोविंद मोहळकर, उप अधीक्षक (भूमी अभिलेख, ठाणे) आणि श्रीकांत विश्वास रावते, भुकरमापक (भूमी अभिलेख, ठाणे) असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शासकीय प्रलंबित कामाच्या अनुषंगाने श्रीकांत रावते, भुकरमापक (वर्ग 3) व चांगदेव गोविंद मोहळकर, उप अधीक्षक, भूमि अभिलेख, ठाणे (वर्ग 2), हे लाचेच्या रक्कमेची मागणी करीत असलेबाबत तसेच उप अधीक्षक चांगदेव मोहळकर, यांनी कामाबाबत जमिन मोजणी करून देण्यासाठी यापूर्वी एक लाख 95 हजार रूपये लाच घेतल्याबाबत 27 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार देण्यात आली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी कारवाई केली असता यातील तक्रारदार यांचेकडे भूकरमापक श्रीकांत रावते यांनी एक लाख रु. लाचेच्या रकमेची मागणी करुन तडजोडअंती 75 हजार रु. लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती.तसेच उप अधीक्षक मोहळकर यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचेकरीता लाचेच्या रक्कमेची मागणी करुन तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने एसीबीने (5 मार्च) रोजी सापळा रचून श्रीकांत रावते, भुकरमापक, यांना 75 हजार लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच,चांगदेव गोविंद मोहळकर, उप अधीक्षक, यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. दोघांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे धर्मराज सोनके पोलीस उप अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी सांगितले आहे.