क्रीडा

Asia Champion 2025 : सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ‘आशिया चॅम्पियन’! बीसीसीआयकडून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 21 कोटींचे जंगी बक्षीस जाहीर!

•टी-20 आशिया कपवर भारताचे नववे वर्चस्व; तिलक वर्माची नाबाद 69 धावांची मॅचविनिंग खेळी

ANI :- टी-20 क्रिकेटमधील आशिया खंडाचा किंग कोण हे टीम इंडियाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताचा हा 17व्या टी-20 आशिया कप स्पर्धेतील सलग सातवा आणि एकूण नववा विजय ठरला.

या ऐतिहासिक आणि रोमहर्षक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तात्काळ संघासाठी बक्षीस रकमेची मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने एक्स (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली की, आशिया कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी तब्बल 21 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील.

प्रत्येकाला 1 कोटी?

बीसीसीआयच्या मुख्य संघात 15 खेळाडू आणि 5 सपोर्ट स्टाफचे सदस्य (मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, बॉलिंग-बॅटिंग आणि फिल्डिंग कोच) असे एकूण 20 सदस्य आहेत. त्यामुळे ही 21 कोटींची रक्कम विभागल्यास प्रत्येक सदस्याच्या वाट्याला सुमारे 1 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या या मोठ्या निर्णयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास आणि उत्साह आणखी वाढणार हे निश्चित आहे.

सामन्याचा थरार

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना साहिबजादा फरहाने (57 धावा) आणि फखर झमान (46 धावा) यांच्या योगदानाच्या बळावर 19.1 षटकांत 145 धावांपर्यंत मजल मारली होती.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताने 20 धावांत 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर युवा त्रिकुटाने विजयाचा पाया रचला. तिलक वर्मा, संजू सॅमसन (24 धावा) आणि शिवम दुबे (33 धावा) यांनी संयमी पण आक्रमक खेळी केली. तिलक वर्माने संजू आणि शिवमसोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. अखेरीस, तिलक वर्माने नाबाद 69 धावांची मॅचविनिंग खेळी करत, 2 चेंडू आणि 5 विकेट्स राखून भारताच्या विक्रमी नवव्या आशिया कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0