
Uddhav Thackeray On BJP Member : ठाकरे बंधूंच्या व्यासपीठावरून फुंकले लढाईचे रणशिंग; “गद्दारांची जागा निष्ठावंत घेतील”, एकनाथ शिंदेंनाही ठणकावले
मुंबई l शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सोहळ्यात आज राजकारणातील एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. राज ठाकरे Raj Thackeray यांच्यानंतर व्यासपीठावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट केंद्र सरकार आणि बंडखोर नेत्यांवर तोफ डागली. “मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात लढत राहणार आणि त्यांची गुलामगिरी कधीही पत्करणार नाही,” अशा प्रखर शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
“दोन व्यापाऱ्यांचे गुलाम होऊ नका”
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. जर आपण आपला स्वाभिमान विसरलो, तर पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलले जाऊ. आज देशात जे दोन ‘व्यापारी’ बसले आहेत, त्यांना महाराष्ट्र आणि मुंबई गुलाम म्हणून हवी आहे. पण शिवसैनिक कधीही गुलामी स्वीकारणार नाही, अशी शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गद्दारी आणि निष्ठेवर भाष्य मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील बंडखोरी आणि निकालांवर बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. “काही जणांना सर्व काही देऊनही त्यांनी गद्दारी केली. जेव्हा माणसं विकली जातात, तेव्हा वाईट वाटतं. पण एका गद्दाराची जागा आता चार निष्ठावंत घेतील, हे येणाऱ्या काळात आपल्याला दाखवून द्यायचे आहे. 100 पराभव झाले तरी एक मोठा विजय सर्व दुःख पुसून टाकतो,” असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांना धीर दिला.
“शिवसेना संपवू पाहणाऱ्यांना गाडून टाकू”
भाजपवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेना हा केवळ पक्ष नसून तो एक विचार आहे. “भाजपला वाटत असेल की ते शिवसेना संपवतील, पण शिवसेना ही अन्यायाविरुद्ध पेटलेली ‘मशाल’ आहे. ही मशाल घरे पेटवण्यासाठी नाही, तर गोरगरिबांच्या घरातील चूल पेटवण्यासाठी आहे,” असे सांगत त्यांनी आगामी संघर्षाचे संकेत दिले.
पुन्हा मैदानात उतरणार!
मुंबईतील पराभवाने खचून न जाता उद्धव ठाकरे यांनी नव्या मोहिमेची घोषणा केली. “मी पुन्हा एकदा मुंबईतील प्रत्येक शाखेत जाणार आहे. जिथे आपण जिंकलो तिथे तर जाणारच, पण जिथे पराभव झाला तिथे अधिक ताकदीने पोहोचणार आहे. ‘जय महाराष्ट्र’चा उद्घोष पुन्हा एकदा आसमंत दणाणून सोडेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणे आणि उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्तेला थेट ‘व्यापारी’ संबोधून दिलेले आव्हान, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे.


