Daund News : ड्रोनच्या भीतीने दौंड तालुका भयभीत ; पोलिस किंवा प्रशासकीय यंञणेकडून खुलासा होणे गरजेचे
अफवानी नागरिक हैराण
दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी
दौंड, ता. ३ दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये व वाड्या वस्त्यावर सध्या ड्रोनच्या घिरट्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राञीच्या अंधारात तीन चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. त्यांनतर यवत पोलिस स्टेशन हद्दीतील काही गावांमध्ये चोरीच्याही घटना घडल्या आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस किंवा प्रशासकीय यंञणेकडून खुलासा होणे गरजेचे आहे. ड्रोनच्या या घिरट्यांमुळे राञीच्या वेळी गस्त घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
पूर्वी असलेली पोलीस मित्र संघटना पुन्हा खेडोपाडी निर्माण करावी लागण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. यामध्ये पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, काही तरुण मंडळे आदींनी पुढाकार घ्यावा अशी ग्रामस्थ चर्चा करत आहेत. राञीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. काही वेळ घिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी यवत पोलिस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटना घडल्या आहेत. तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असं काही स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं आहे.
राञीच्या वेळीच हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता राञीची उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रोन फिरत असल्याच्या घटनांबाबत प्रशासनाकडून सध्या तरी बघ्याचीच भूमिका घेतली गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही ड्रोनच्या घिरट्यांचे गूढ उकलत नसल्याने पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सध्यातरी कुचकामी ठरल्याचे बोलले जात आहे.