Vikas Gogawale : हायकोर्टाच्या दणक्यानंतर मंत्र्यांचे सुपुत्र पोलिसांना शरण! विकास गोगावले ‘मागच्या दाराने’ महाड पोलीस ठाण्यात हजर

•नगरपालिका निवडणुकीतील राडा आणि मारहाण प्रकरणी 53 दिवसांपासून होते फरार; अटकपूर्व जामिनावर आजच सुनावणी; महाडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त
महाड l रायगड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेले शिंदे गटाचे प्रबळ नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर शुक्रवारी सकाळी महाड पोलिसांसमोर शरण आले. नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या तुफान राडा आणि मारहाण प्रकरणी आरोपी असलेले विकास गोगावले 2 डिसेंबर 2025 पासून फरार होते. विशेष म्हणजे, कोणालाही भनक लागू न देता ते पोलीस ठाण्याच्या मागच्या दाराने आत शिरले आणि त्यांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केले.
न्यायालयाचे कडक ताशेरे आणि शरण येण्याचे आदेश विकास गोगावले यांच्या अटकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “मंत्र्यांची मुले फरार होतातच कशी आणि पोलीस त्यांना शोधू का शकत नाहीत?” अशा कडक शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले होते. न्यायालयाने गोगावले यांना आज सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे अंतिम आदेश दिले होते. अटकेची नामुष्की टाळण्यासाठी आणि न्यायालयाच्या आदेशाचा मान राखण्यासाठी त्यांनी मुदतीपूर्वीच आत्मसमर्पण केले.
निवडणूक काळातील तो राडा आणि राजकीय संघर्ष महाड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. यावेळी वाहनांची तोडफोड आणि एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले होते. याप्रकरणी दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोगावले यांच्या अडचणी वाढल्या होत्या, तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
महाडमध्ये तणावपूर्ण शांतता
पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप विकास गोगावले शरण आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच महाड पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, थोड्याच वेळत त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. आजच त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असून, न्यायालय त्यांना दिलासा देणार की पोलीस कोठडी सुनावणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



